''भारतीय संघात मित्र राहिलेले नाही, तर फक्त सहकारी राहिले आहेत,'' आर अश्विनने काही दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं. भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनीही हाच धागा पकडला आहे. भारतीय संघात बाँडिंग नाही आणि त्यामुळेच संघाला चांगली कामगिरी करता येत नसल्याचा दावा गावस्करांनी केला आहे.
“ही एक दुःखाची गोष्ट आहे, कारण सामना झाल्यानंतर तुम्ही एकत्र यायला हवं. तेव्हा तूम्ही सामन्यामबद्दल बोलू नका, परंतु म्युझीकबद्दल बोला, तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटांबद्दल बोला, कदाचित तुमच्या आवडीबद्दल बोला. पण तसे होत नसेल तर ते निराशाजनक आहे. २० वर्षांपूर्वी किंवा त्याहून अधिक काळ सुरू झालेली नवीन परंपरा म्हणजे प्रत्येक खेळाडूला त्याची स्वतंत्र रुम मिळते आणि संघातील बाँडिंग हरवण्यामागे हे देखील एक घटक असू शकते ...” असे सुनील गावस्कर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
गावस्कर यांनी निदर्शनास आणून दिले आहे, की कदाचित जीवनातील सामान्य गोष्टींबद्दल न बोलल्याने संघातील सहकाऱ्यांमधील बाँडिंग कमी झाले आहेत. भारतीय संघाला महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत मागच्या वर्षी भारतीय संघ अव्वल ४ मध्ये हरला होता आणि मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हार झाली. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्येही लाजीरवाणा पराभव झाला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
द्विदेशीय मालिकांमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवले असले तरी आयसीसीच्या स्पर्धांमधील कामगिरी असमाधानकारक आहे. विराट कोहलीकडून भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मला त्याच्याकडून (रोहित) अधिक अपेक्षा होत्या. भारतात ते वेगळे आहे, परंतु जेव्हा तुम्ही परदेशात चांगली कामगिरी करता तेव्हा ती खरोखरच कसोटी असते. तिथेच त्याने थोडी निराशा केली आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्येही आयपीएलमधील सर्व अनुभव, कर्णधार म्हणून शेकडो सामने, आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या मिश्रणासह अंतिम फेरीत प्रवेश न मिळणे निराशाजनक आहे,” असे गावस्कर म्हणाले.