मुंबई : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. गुरूवारी या मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे पार पडला. मालिकेतील दुसरा सामना जिंकून पाहुण्या श्रीलंकेच्या संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. खरं तर या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान संघाने विजयी सलामी दिली होती. कालच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अनेक चुका केल्या ज्याचा फायदा श्रीलंकेला झाला. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने एकाच षटकात 2 नो-बॉल टाकून प्रतिस्पर्धी संघाला धावा करण्याची आयती संधी दिली.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी एका षटकात 2 नो-बॉल टाकणाऱ्या अर्शदीप सिंगवर निशाणा साधला आहे. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने (2 षटकात 0/37) पाच-नो बॉल टाकले, तर उमरान मलिक (4 षटकात 3/48) आणि शिवम मावी (4 षटकात 0/53) यांनी प्रत्येकी एक नो बॉल टाकला. याचाच फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी धावसंख्या 200 पार नेली. पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने दमदार पुनरागमन करत 16 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला केवळ 190 धावा करता आल्या.
गावस्करांनी अर्शदीप सिंगला सुनावले
सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले, "तुम्ही नो बॉल टाकू शकत नाही आणि एवढे तर अजिबातच नाही. एक प्रोफेशनल खेळाडू असल्यामुळे हे बिल्कुल होता कामा नये. आधुनिक युगातील क्रिकेटपटू गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत असे म्हणतात. जे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण नो बॉल टाकणे तुमच्या हातात आहे. तुम्ही गोलंदाजी केल्यानंतर काय होते, फलंदाज काय करतो ही दुसरी गोष्ट आहे, पण नो बॉल टाकणे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे." लक्षणीय बाब म्हणजे अर्शदीप सिंगने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात एकूण 5 नो-बॉल टाकले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sunil Gavaskar has hit out at Arshdeep Singh saying that it is entirely up to the bowler whether to bowl a no-ball or not
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.