Sunil Gavaskar T20 World Cup : भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ चार ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर अंतिम संघ निवडला जाईल. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत संघ निवडीवरून झालेल्या चुका निवड समिती यंदा टाळेल हे नक्की. त्यात भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ओपनिंग जोडी कोण असेल, यावर त्यांचे मत मांडले आहे.
अनुभवी फलंदाज शिखर धवनचे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात पुनरागमन होणे अवघड असल्याचे मत गावस्करांनी व्यक्त केले. धवनने 2014 व 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल 2022मध्ये त्याने दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या नावाचा विचार झाला नाही. त्याजागी निवड समितीने ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांना संधी आहे. रोहित शर्मा व लोकेश राहुल हे या मालिकेत संघाचा भाग नव्हता.आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातही धवनला स्थान मिळाले नाही. अशात
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लोकेश राहुलला गावस्करांनी पहिली पसंती दाखवली आहे. ''या संघात मला शिखर धवनचे नाव दिसत नाही. जर त्याला संधी द्यायचीच असती तर त्याची आयर्लंडविरुद्ध निवड झाली असती,''असे गावस्कर म्हणाले.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
- 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
- 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
- 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
- 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न