sunil gavaskar ipl । नवी दिल्ली : नव्या नियमांनुसार आयपीएल २०२३ ची स्पर्धा सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामापासून आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयरपासून ते नो बॉल आणि वाइड बॉलवर रिव्ह्यू घेऊन फोर्थ अम्पायरची मदत घेता येणार आहे. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक सुनिल गावस्कर यांनी एक अनोखा सल्ला देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुनिल गावस्करांच्या म्हणण्यानुसार, सलग दोन वाइड बॉल टाकल्यानंतर फ्री हिट मिळायला हवी. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात गोलंदाजांनी काही अतिरिक्त धावा दिल्या, ज्यावर सुनिल गावस्कर यांनी हा पर्याय सुचवला.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने आपल्या पहिल्याच षटकात ३ वाइड आणि २ नो बॉल टाकले होते. त्यानंतर १२व्या षटकात दीपक चाहरने सलग तीन वाइड टाकले आणि याचदरम्यान समालोचन करताना सुनिल गावस्कर यांनी म्हटले, "दोन सलग वाइड बॉल टाकल्यानंतर फ्री हिट मिळायला हवी." जेव्हा गावस्करांनी हे विधान केले तेव्हा तिथे सायमन डोल आणि इयान बिशप हे देखील उपस्थित होते. त्यांनी गावस्करांच्या विधानाला नकळत विरोध दर्शवला. पण गावस्करांच्या म्हणण्यानुसार, २ वाइड बॉल टाकल्यानंतर एक फ्रीट दिल्यास गोलंदाज आपल्या लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रीत करेल.
धोनीने म्हटले... चेन्नई सुपर किंग्जने लखनौविरूद्ध विजय मिळवला पण तरीदेखील कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाराज दिसला. चेन्नईच्या गोलंदाजांनी सतत वाइड आणि नो बॉल टाकल्याने धोनीने नाराजी व्यक्त केली. धोनीने म्हटले की, जर गोलंदाजांनी पुढे देखील असेच वाइड आणि नो बॉल टाकले तर कर्णधारपद सोडून देईन. खरं तर चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी या सामन्यात १३ वाइड आणि ३ नो बॉल टाकले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"