आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने स्टार्कला २४.७५ कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
स्टार्कवर विक्रमी बोली लागल्याने त्याच्याकडून साहजिकच फ्रँचायझीला शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मला वाटत नाही की, कोणताही खेळाडू एवढ्या मोठ्या रकमेसाठी पात्र आहे. त्यामुळे स्टार्कला खूप प्रभावी कामगिरी करावी लागेल. १४ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये संघाच्या विजयात योगदान द्यावे लागेल. त्याने असे केले तरच एवढा पैसा ओतल्याचा फायदा होईल.
स्टार्कने सामना जिंकून देणारी कामगिरी केली तरच केकेआरला त्यांनी खर्च केलेल्या पैशाचा मोबदला मिळेल. स्टार्कने किमान चार सामन्यांमध्ये मॅच-विनिंग कामगिरी करायला हवी. कदाचित मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी या प्रमुख संघांच्याविरुद्ध त्याने चमक दाखवावी. कारण या तीन संघांमध्ये इतर संघांच्या तुलनेत उच्च दर्जाची फलंदाजी आहे, असेही गावस्करानी सांगितले. ते 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलत होते.
मिचेल स्टार्कची ऐतिहासिक कमाई
आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.
Web Title: Sunil Gavaskar made a big statement after Kolkata Knight Riders franchise bought Australian player Mitchell Starc for IPL 2024 for Rs 24.75 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.