Sunil Gavaskar Mother Passes Away: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान समालोचन करत असताना माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासाठी एक वाईट बातमी आली. त्यांच्या आई, मीनल गावसकर यांचे मुंबईत आज निधन झाले. गावस्कर यांच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावली होती. याच कारणामुळे सुनील गावसकर आयपीएलच्या गेल्या मोसमात बाद फेरीत समालोचनासाठीही उपस्थित नव्हते. ते आपल्या आईची काळजी घेण्यासाठी घरी परतले होते. सुनील गावसकर यांच्या आई मीनल गावस्कर यांचे ९५ वर्षी आज सकाळी मुंबईतच निधन झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील गावसक यांच्या आईचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाल्याची माहिती आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सुनील गावसकर हे समालोचन करत होते. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता. त्यांना आईच्या निधनाची वार्ता सकाळी माहिती मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी समालोचन सुरू ठेवत आपले कर्तव्य बजावले. आपले दु:ख त्यांनी लोकांना जाणवू दिले नाही, यासाठी अनेक नेटकऱ्यांनी त्यांना सलाम केल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.
सुनील गावसकर यांच्या आई मीनल या गेल्या एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला IPL दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. IPL साठी कॉमेंट्री करणाऱ्या गावसकरांना आपल्या आजारी आईच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी बायो-बबलमधून बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी ते बायो-बबलमधून बाहेर पडत आईच्या सेवेसाठी हजर झाले होते.
दरम्यान, ७३ वर्षीय गावस्कर हे भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांची कारकीर्द 1971 ते 1987 अशी होती. यादरम्यान त्याने 125 कसोटींमध्ये 34 शतकांसह 10,125 धावा केल्या. त्याने भारतासाठी 108 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 3,092 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार करणारा गावसकर जगातील पहिला फलंदाज होता. त्याने 47 कसोटी सामने आणि 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर ते अजूनही समालोचन करत आहेत.