मुंबई: पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडकडून भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानं टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर भारताला नमवत न्यूझीलंडनं आव्हान कायम राखलं आहे. न्यूझीलंडनं ८ गडी राखून भारतावर सफाईदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं ७ फलंदाजी गमावून अवघ्या ११० धावा केल्या.
फलंदाजी क्रम का बदलला? गावसकर संतापले
भारतानं काल फलंदाजीचा क्रम बदलला. लोकेश राहुलसोबत रोहित शर्माऐवजी इशान किशनला सलामीला पाठवण्यात आलं. याबद्दल गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. किशननं ८ चेंडूत अवघ्या ४ धावा केल्या. इशान किशनसारख्या तरुण फलंदाजावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी द्यायला नको होती, असं गावसकर म्हणाले.
'अयशस्वी होण्याची भीती मनात होती का याची मला कल्पना नाही. पण फलंदाजीच्या क्रमात करण्यात आलेले बदल योग्य ठरले नाहीत. रोहित शर्मा उत्तम फलंदाज आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवलं? कोहलीनं स्वत: तिसऱ्या क्रमांकावर येऊन खूप धावा केल्या आहेत. पण तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला,' अशा शब्दांत गावसकर यांनी फलंदाजीत करण्यात आलेल्या बदलांमध्ये नाराजी व्यक्त केली.
'इशान किशन हिट-मिस स्वरुपाचा खेळाडू आहे. अशा फलंदाजाला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर पाठवायला हवं. तो सामन्याच्या परिस्थितीच्या दृष्टीनं खेळू शकतो. पण तुम्ही काय केलंत..? ट्रेंट बोल्टची डावखुरी गोलंदाजी कुला खेळता येणार नाही, असा मेसेज तुम्ही रोहित शर्माला दिला. एखादा खेळाडू अनेक वर्षांपासून सलामीला खेळत असेल आणि तुम्ही अचानक त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवता, तेव्हा त्या खेळाडूला स्वत:च्या क्षमतेवर शंका वाटू लागते,' असं गावसकर म्हणाले.
Web Title: Sunil Gavaskar Is Not Happy After India Changed Its Batting Order In Match Against New Zealand In T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.