Sunil Gavaskar reaction on MS Dhoni CSK, IPL 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या IPL गाजवतोय. नुकतेच धोनीने IPL मध्ये CSKसाठी खेळताना २०० सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याचा भीमपराक्रम केला. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या १२ एप्रिलच्या सामन्यात त्याने हा मोठा विक्रम केला. चेन्नईचा संघ त्या सामन्यात चुरशीच्या लढतीत ३ धावांनी पराभूत झाला. ४१ वर्षीय महेंद्रसिंग धोनी अशा प्रकारची कामगिरी करणारा पहिला कर्णधार ठरला. IPLमध्ये असा पराक्रम याआधी कोणालाच जमलेला नाही. असे असतानाच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी महत्त्वाचे विधान केले.
"धोनीसारखा कर्णधार मी याआधी कधीही पाहिलेला नाही. भविष्यातही त्याच्याइतका उत्तम कर्णधार होणार नाही. एखाद्या संघासाठी २०० सामन्यात नेतृत्व करणे ही गोष्ट सोपी नाही. कर्णधारपद हे खूप मोठे दडपण असते. त्याचा तुमच्या खेळावरही परिणाम होऊ शकतो. पण महेंद्रसिंग धोनी हा एक असा कर्णधार आहे ज्याने आपला खेळही चांगला ठेवला होता. तो एक वेगळ्याच पद्धतीचा कर्णधार आहे. त्याच्यासारखा कर्णधार आजपर्यंत कधी झाला नाही आणि यापुढे भविष्यातही होणे नाही," अशा शब्दांत गावसकरांनी आपले मत मांडले.
गावसकर विराटबद्दलही बोलले. "विराट कोहली या हंगामात आरसीबीला वेगवान सुरुवात देत आहे, आरसीबीचा संघ या हंगामात धावा करण्यात सक्षम आहे, याचे बरेच श्रेय विराट कोहलीला द्यायला हवे. हे RCB साठी एक चांगले चिन्ह आहे. पण चेन्नई सुपरकिंग्जला कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे. सामन्यांचे कर्णधारपद हे कोणासाठीही ओझे ठरू शकते," असे ते म्हणाले.