Sunil Gavaskar opines on Shreyas Iyer's batting position - भारतीय संघाने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दिशेने दमदार पाऊल टाकताना सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज यांच्यापाठोपाठ श्रीलंकेविरुद्धची मालिकाही ३-० अशी जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने दणदणीत विजयाची मालिका कायम राखली आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) हा विजयाचा शिल्पकार ठरला. भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी श्रेयसचे कौतुक केलेच, शिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाल्यानंतर श्रेयससाठी फलंदाजीचा क्रमही सुचवला.
तिसऱ्या सामन्यात सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार पटकावणारा श्रेयस म्हणाला,''हे तिनही अर्धशतक माझ्यासाठी खास आहेत. तुम्हाला फॉर्मात येण्यासाठी फक्त एक चेंडूची गरज आहे. या मालिकेत मिळालेल्या संधीचं सोनं केलं, याचा मला आनंद आहे. माझा प्रवास हा चढ-उतारांचा राहिलाय. दुखापतीतून सावरून या स्तरावर अशी कामगिरी करणे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.''
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाल्यानंतर श्रेयस अय्यरला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवायला हवे, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले. विराट कोहलीची जागा कुणी घेऊ शकत नाही. गावस्कर म्हणाले,'' आता भारतासाठी चांगल्या अर्थाने डोकेदुखी वाढणार आहे. विराटची जागा कुणी घेऊ शकत नाही. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, त्यात काही शंकाच नाही. परंतु त्यानंतर श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूचा तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उपयोग करून घेऊ शकता. सूर्यकुमार यादव आहेच, त्याचाही संघात समावेश करायला हवा.''
गोलंदाजी विभागाबाबत गावस्कर म्हणाले,''तिथेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यामुळे फक्त गोलंदाज तुम्ही खेळवू शकता. फलंदाजांची मजबूत फौज असताना मोहम्मद सिराज किंवा आवेश खान हे चांगले पर्याय ठरतील.''