भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं. चेतन चौहान आणि सुनील गावसकर यांनी अनेकदा भारतीय संघाला शतकी सुरुवात करून दिली. चौहान आणि गावसकर यांनी सलामीला येत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. गावसकर यांनी अनेक संस्मरणीय खेळी साकारल्या. मात्र चौहान यांना एकदाही शतकं साजरं करता आलं नाही. कित्येक सामन्यांमध्ये एकत्र फलंदाजी केलेल्या, मोलाच्या भागिदारी रचलेल्या गावसकर यांच्या मनात चौहान यांच्या अनेक आठवणी आहेत. त्याच आठवणींना गावसकर यांनी उजाळा दिला आहे.''ये ये, गळाभेट घे.. कारण आपण आयुष्यातील अनिवार्य षटकं खेळतोय,'' गेल्या दोन-तीन वर्षात जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो, त्यावेळी चेतन चौहानचे हेच शब्द असायचे. या भेटी त्याच्या आवडत्या फिरोजशहा कोटला मैदानावर व्हायच्या. तिथे त्याच्यावर खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी होती. आम्ही एकमेकांना मिठी मारायचो. त्यावेळी मी त्याला म्हणायचो, 'नाही रे, आपल्याला आणखी एक शतकी भागिदारी रचायची आहे.' त्यावर तो हसून प्रत्युत्तर द्यायचा, 'अरे बाबा, शतक तर तू ठोकायचास. मी नाही.' चेतनचे शब्द आयुष्याच्या अनिवार्य षटकांमध्ये अशा पद्धतीनं खरे ठरतील, असा विचारही मी कधी केला नव्हता. मी पुढे दिल्लीला जाईन, त्यावेळी त्याचा हसरा चेहरा दिसणार नाही, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही.'चेतन चौहान यांना एकही शतक झळकावता आलं नाही, त्यासाठी मी जबाबदार असल्याचं सुनिल गावसकर म्हणतात. 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९८०-८१ मधल्या मालिकेत चेतनचं शतक दोनदा हुकलं. ऍडलेडमधल्या दुसऱ्या कसोटीत चेतन ९७ धावांवर असताना मला इतर सहकाऱ्यांनी टीव्हीसमोरून उठवलं आणि चेतनला प्रोत्साहन देण्यासाठी बाल्कनीत आणलं. मी बाल्कनीत आलो की खेळाडू बाद होतो, अशी एक अंधश्रद्धा माझ्या मनात होती. त्यामुळे मी कायम ड्रेसिंग रुममधील टीव्हीवर सामना पाहायचो. पण इतर खेळाडूंच्या आग्रहास्तव मी बाल्कनीत आलो आणि चेतन डेनिस लिलीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मी त्यानंतर ही गोष्ट संघातल्या खेळाडूंना सांगितली. मात्र त्यामुळे घडून गेलेला प्रसंग बदलणार नव्हता. त्यानंतर काही वर्षांनी आम्ही कानपूरमध्ये खेळत होतो. मोहम्मद अझरुद्दीन सलग तिसऱ्या शतकाकडे वाटचाल करत होता. यावेळी मी त्या चुकीच्या पुनरावृत्ती केली नाही. त्याचं शतक झाल्यावरच मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर आलो आणि साईटस्क्रीनजवळून त्याला प्रोत्साहन दिलं. मात्र त्यावेळी माध्यमांमधल्या माझ्या काही मित्रांनी माझ्या अनुपस्थितीची मोठी बातमी केली. मात्र त्याच्या आदल्या वर्षी दिल्लीत मी सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांची बरोबरी केली. त्यावेळी तिथे अनुपस्थित असलेल्या काही जणांबद्दल त्यांनी काहीच लिहिलं नाही.''चेतन पुन्हा एकदा नव्वदीत असताना, त्यावेळीही त्याचं शतक माझ्यामुळेच हुकलं. चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आल्यानं माझा संयम ढळला. स्टेडियममध्ये परतताना माझा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत वाद झाला. त्यामुळे चेतनच्या एकाग्रतेवर परिणाम झाला आणि तो पुन्हा एकदा शतक साजरं करू शकला नाही.'खेळाडूंना कर कपात मिळवून देण्यात मोलाचं योगदान'खेळाडूंना कर सवलत मिळवून देण्यात चेतनचं मोठं योगदान होतं, याची माझ्या पिढीसह त्यानंतर आलेल्या अनेक खेळाडूंना कल्पना नाही. आम्ही सर्वात आधी आर. व्यंकटरमण यांना भेटलो. ते त्यावेळी अर्थमंत्री होते. भारतासाठी खेळताना मिळणाऱ्या शुल्कावर आकारल्या जाणाऱ्या करात सूट मिळावी, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे धरला.''आम्ही केलेली मागणी फक्त क्रिकेटसाठी नव्हती. तर सर्व खेळांमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांसाठी होती. आम्ही कनिष्ठ क्रिकेटपटू असताना साहित्य, प्रवास, कोचिंगवर बराच पैसा खर्च करावा लागायचा. मात्र आमच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं.''व्यंकटरमणजींनी यावर विचार करून अधिसूचना जारी केली. त्यामुळे आम्हाला कसोटी सामना शुल्कावर ७५ टक्के कर कपात मिळाली. याशिवाय दौऱ्यावर जाण्यापूर्वी मिळणाऱ्या शुल्कावर आकारण्यात येणारा करही ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला. त्यात आनंद द्विगुणीत करणारी बाब म्हणजे, एकदिवसीय सामन्यांसाठी मिळणाऱ्या ७५० रुपयांच्या शुल्कावर पूर्णपणे सूट मिळणार होती. विशेष म्हणजे त्यावेळी आम्ही केवळ एक किंवा दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनेच खेळलो होतो.''ही अधिसूचना १९९८ पर्यंत कायम होती. तोपर्यंत एकदिवसीय सामन्यांची संख्यादेखील वाढली होती आणि सामना शुल्कदेखील एक लाखांच्या आसपास पोहोचलं होतं. त्यामुळे ९० च्या दशकाच्या मध्यावर खेळाडूंना २५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम करमुक्त मिळायची. माझ्या निवृत्तीनंतर मी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंना अधिसूचनेची प्रत द्यायचो. ती त्यांना त्यांच्या अकाऊंटंटला देता यायची.'शेवटपर्यंत दाता राहिला, कधीच कोणाकडून काही घेतलं नाही'क्रिकेटपटूंना करामध्ये सूट मिळवून देणं हेच आपलं सर्वात मोठं योगदान असेल, असं चेतन कायम म्हणायचा. दुसऱ्यांना मदत करायची इच्छा कायम त्याच्या मनात असायची. त्याच इच्छेनं त्यानं राजकारणात प्रवेश केला. तो शेवटपर्यंत देत राहिला. त्यांना कधीच कोणाकडून काही घेतलं नाही.'चौहान यांचा विनोदी स्वभाव 'चेतनचा स्वभाव अतिशय विनोदी होता. आम्ही आव्हानात्मक परिस्थितीत गोलंदाजांचा सामना करताना तो गाणं म्हणायचा- मुस्कुरा लाडले मुस्कुरा... आव्हानात्मक परिस्थितीमुळे आलेला तणाव हलका करण्याची त्याची ही पद्धत होती. आता माझा साथीदारच नाही. मग मी कसा हसू शकतो? साथीदारा, देव तुझ्या आत्म्याला शांती देवो..'
- Cricket Buzz»
- बातम्या»
- माझ्यामुळेच चेतन शतक करू शकला नव्हता!; सुनील गावस्करांचा 'पार्टनर'साठी भावुक लेख
माझ्यामुळेच चेतन शतक करू शकला नव्हता!; सुनील गावस्करांचा 'पार्टनर'साठी भावुक लेख
सुनिल गावसकर आणि चेतन चौहान यांनी अनेकदा संघाला शतकी सुरुवात करून दिली. मात्र चेतन कधीही शतक झळकावू शकले नाहीत.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 9:48 AM