Sunil Gavaskar on Team India Bowling : भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीवर एका मुलाखती दरम्यान कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर हा एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहची प्रतिभाही आपण विसरू शकत नाही. त्यातच भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि सिराजसारखे गोलंदाजही भारताकडे आहेत, अशा शब्दात त्यांनी भारतीय गोलंदाजांवर स्तुतिसुमनं उधळली. यावेळी बोलताना, भारताकडे असलेला एक गोलंदाज हा जगातील कोणत्याही संघात गेला तरी त्याला हसतहसत संघात घेतील, असं मोठं विधान गावसकर यांनी केलं.
“दीपक चहर एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे. त्याच्याकडे अतिरिक्त वेगही आहे. तो दोन्हीकडे चेंडू स्विंग करून शकतो. त्याच्या अँक्शनमध्ये फारसा बदल होत नसल्यामुळे फलंदाजांना अंदाज येत नाही. त्याच्या उत्तम कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारसारखा खेळाडूही बेंचवर बसतो. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांसारखे गोलंदाजही भारतीय संघाकडे आहेत. पण या साऱ्यांमध्ये जसप्रीत बुमराहला विसरता येणार नाही. तो एक असा गोलंदाज आहे जो फक्त भारताच्याच नव्हे तर जगातील कोणत्याही संघात गेला तरी त्याला सहजपणे संघात स्थान मिळेल", असं वक्तव्य सुनील गावसकर यांनी केलं.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाची पुढील मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पहिला टी२० सामना लखनौ येथे तर पुढील दोन्ही सामने धर्मशाला येथे होणार आहेत. त्यानंतर ४ मार्चपासून दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळण्यात येणार आहे. त्यातील एक कसोटी ही डे नाईट पद्धतीची असणार आहे.
भारत-श्रीलंका टी२० मालिका
२४ फेब्रुवारी - पहिली टी२० - लखनौ२६ फेब्रुवारी - दुसरी टी२० - धरमशाला२७ फेब्रुवारी - तिसरी टी२० - धरमशाला
भारत - श्रीलंका कसोटी मालिका
४ ते ८ मार्च - पहिली कसोटी - मोहाली१२ ते १६ मार्च - दुसरी कसोटी - बंगळुरू (डे नाईट टेस्ट)