मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न झालेली रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सराव सत्रामध्ये सहभागी होत असतानाही रोहितची निवड भारतीय संघात कशी झाली नाही, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. यामध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही बीसीसीआवर (BCCI) टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी रोहितला पाठिंबा दर्शविताना, ‘बीसीसीआयला दाखवून देण्यासाठीच रोहित आयपीएलचा सामना खेळला,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने दुखापतीनंतर पुनरागमन केले. तीन सामन्यानंतर पुनरागमन केलेल्या रोहितनेही, आता मी पूर्णपणे फिट असल्याचे म्हटले. यानंतर गावसकर रोहितचे समर्थन करताना म्हणाले, ‘बीसीसीआयला आपली तंदुरुस्ती दाखवण्यासाठीच रोहित अखेरच्या साखळी सामन्यात खेळला.’
एका यू ट्यूब चॅनलवर गावसकर यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत रोहितच्या दुखापतीवरून जे काही घडले, ते आता एका बाजूल ठेवून द्यावे. मला एक सांगायचे आहे की, भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे की, रोहित शर्मा फिट झाला आहे. ज्यांनी सांगितले की, घाई केल्यास रोहित पुन्हा दुखापतग्रस्त होईल, अगदी बरोबर आहे. पण तो मैदानावर पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळताना दिसला. त्याने सीमारेषेवर आणि सर्कलच्या आतही क्षेत्ररक्षण केले.’
गावसकर पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयला आपली तंदुरुस्ती दाखवून देण्यासाठी रोहितने अखेरचा साखळी सामना खेळला. मात्र तरीही, बीसीसीआय त्याची तंदुरुस्ती चाचणी घेऊ इच्छिते, तर त्यात काही चुकीचेही नाही. रोहित पूर्णपणे फिट आहे की, नाही हेच त्यांना तपासून पहायचे आहे.’
Web Title: Sunil Gavaskar reaction Rohit played to show the BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.