India vs South Africa 1st test Day 4: भारतीय संघाने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतल्यानंतर संघाचा दुसरा डाव अवघ्या १७४ धावांत आटोपला. अतिशय सुमार दर्जाची फलंदाजी करत भारतीय खेळाडू बाद झाले. सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरणारी मधली फळीही ढेपाळली. परंतु सर्वाधिक चर्चा झाली ती कर्णधार विराट कोहलीच्या विकेटची. विराटने पहिल्या डावात ३५ धावांची खेळी केली होती पण तो ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू मारताना बाद झाला. आजही अशाच प्रकारचा एक चेंडू खेळताना त्याने विकेट बहाल केली. त्याच्या या कामगिरीवर सुनील गावसकर यांनी रोखठोक मत व्यक्त केलं.
"विराटने खेळलेला फटका हा बेजबाबदारपणाचा होता हे नक्की. कसोटी सामन्यात लंच ब्रेक वरून आल्यानंतर कोणताही फलंदाज मैदानात स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतो. लंच ब्रेकच नव्हे तर साधा चार मिनिटांचा ब्रेक जर झाला तरी पुन्हा पिचवर उभा राहिल्यावर फलंदाज संयमाने खेळण्याचा विचार करतो. पुन्हा सामन्यात लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. विराट हा अतिशय अनुभवी फलंदाज आहे त्यामुळे त्याच्याकडून असी चूक होणं अपेक्षित नव्हतं", अशा शब्दात गावसकरांनी आपलं मत मांडलं.
"विराट गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी सामने खेळत आहे. त्याला बरेच वर्ष फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. पण असा अनुभव असताना असा फटका विराटने का खेळला असावा याची कल्पना नाही. कदाचित त्याच्या मनात झटपट धावा करण्याचा विचार आला असावा आणि म्हणूनच लंच ब्रेकनंतरचा पहिलाच चेंडू विराटने ऑफ स्टंपबाहेर असूनही मारला", असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
विराट कसा झाला बाद, पाहा व्हिडीओ-
विराट कोहलीने चौथ्या दिवशीचे पहिले सत्र संपेपर्यंत संयमी खेळी केली. १८ धावांवर असताना तो लंच टाईमसाठी गेला. पण दुसऱ्या सत्रासाठी परतल्यावर पहिल्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. नव्या दमाचा गोलंदाज मार्को जेन्सन याने विराटला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. तो चेंडू मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बसला. पहिल्या डावात विराटने ३५ धावांची खेळी केली होती. त्यावेळीही ऑफ स्टंपबाहेरील चेंडूनेच त्याचा घात केला होता. ती चूक न सुधारता दुसऱ्या डावातही तो तसाच बाद झाला.