नवी दिल्ली: भारताचा स्टार खेळाडू असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. विराट कोहलीच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विराटचे चाहते तसेच क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला निर्णय जाहीर केला. यानंतर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच लिटिल मास्टर म्हणून ओळख असलेले भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला. यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यावर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. मालिका गमावल्यानंतर झालेल्या प्रेसेंटेशनवेळी विराट कोहली निर्णय जाहीर करेल, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. शनिवारी विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. हे अपेक्षितच होते. मला या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असे गावसकर म्हणाले.
कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊ शकते या भीतीने निर्णय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आता कर्णधारपदावरून आपली हकालपट्टी होऊ शकते, याचा अंदाज बहुतेक विराट कोहलीला आला होता आणि गच्छंतीच्या भीतीने विराट कोहलीने हा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका भारत जिंकेल, असे वाटत होते. मात्र, १-२ ने मालिका भारतीय संघाने गमावली. अशा स्थितीत हा निर्णय घेणे विराटला गरजेचे झाले होते, असे मतही सुनील गावसकर यांनी मांडले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. ही कसोटी मालिका भारतीय संघ ३-० ने जिंकेल, असा दावा सुनील गावसकर यांनी केला होता. मात्र, तो फोल ठरला. मात्र, विराट कोहलीने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे, असे कौतुकही गावसकर यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. भारतीय संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु पुढील दोन्ही कसोटीत आफ्रिकेने दमदार कमबॅक करून मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर बीसीसीआयने वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी केली आणि शनिवारी त्याने कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले.