Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: आयपीएलमध्ये सोमवारी मध्यरात्री इकाना स्टेडियमवर यजमान लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. आरसीबीने हा सामना १८ धावांनी जिंकला. यानंतर विराट कोहली आणि लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार भांडण झाले. यामुळे दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले. दोघांवरही बीसीसीआयने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. कोहली- गंभीर यांनी गुन्हा कबूल केला असून लखनौचा नवीन उल हक याच्यावर ५० टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला.
विराट कोहली आणि गंभीरच्या या वादावर देशभरातील विविध आजी-माजी खेळाडू प्रतिक्रिया दिली आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी या प्रकरणावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. कोहली आणि गंभीरला असे भांडताना पाहून मी खूप निराश झालो, असं सुनील गावस्कर यांनी सांगितले.
'आता तु मला शिकवणार?'; विराट कोहली अन् गौतम गंभीर एकमेकांना नेमकं काय म्हणाले...पाहा
मी लखनौ आणि बंगळुरुचा सामना लाइव्ह पाहिला नाही. मात्र या सामन्यामधील कोहली आणि गंभीरचे अनेक व्हिडिओ पाहिले. या सर्व गोष्टी कधीच चांगल्या दिसल्या नाहीत. १०० टक्के मॅच फी म्हणजे नक्की किती?, विराट कोहली असेल तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून १७ कोटी रुपये मिळतात. म्हणजे जवळपास १६ सामन्यांसाठी १७ कोटी रुपये मिळतात. त्यात उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचाही समावेश आहे. त्यात तुम्ही १ कोटीची चर्चा करताय?, १ कोटी रुपयांचा दंड कठोर दंड आहे का?, असा सवाल सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, गौतम गंभीरच्या मॅच फीसबाबत मला माहिती नाही. परंतु अशी घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता बोर्डाने घ्यावी. आम्ही खेळायचो तेव्हा आपापसात वाद व्हायचे, पण अशी आक्रमक वृत्ती कधीच नव्हती. त्यामुळे अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना काही सामन्यांसाठी निलंबित करणे हाही एक मार्ग असू शकतो. जसे १० वर्षांपूर्वी हरभजन सिंग आणि श्रीशांत यांना लागू केले होते. मग कोहली आणि गंभीरला देखील काही मॅचसाठी निलंबित का करत नाही?, असा सवाल उपस्थित करत अशा घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
कुठून सुरु झाला वाद?
१० एप्रिलच्या रात्री लखनौने बंगळुरुला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर गंभीरच्या हावभावाने वादाला सुरुवात झाली. या अपमानाची वेदना कोहलीच्या हृदयात कुठेतरी दडली होती. काल विराटने कृणाल पांड्याचा लॉंग ऑफवर झेल घेतला तेव्हा त्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो स्टँडकडे बघत छाती ठोकत होता आणि मग फ्लाइंग किस दिला. यानंतर बहुधा त्याने तोंडावर बोट ठेवून आपला बदला घेतला. डगआऊटमध्ये बसून गंभीर शांतपणे हे पाहत होता.
सामना संपल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करीत होते. अफगाणिस्तानचा नवीन उल-हक आणि कोहली यांच्यात वाद सुरु झाला. कोहलीला त्याच्या सहकाऱ्यांनी लांब नेले. तत्पूर्वी, नवीन फलंदाजी करीत असताना विराटसोबत त्याची बाचाबाची झाली होती. कोहली खूपच आक्रमक दिसत होता. सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंसोबत त्याचा वाद झाला. नवीन-उल-हक याच्यापासून वादाची सुरुवात झाली. यानंतर तो अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्याशीही भिडला. अखेर लोकेश राहुल आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. या दोघांमध्ये दहा वर्षाआधीही बंगळुरू येथेच भांडण झाले होते.