भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कामगिरी करताना प्रथमच केपटाउन येथे कसोटी सामना जिंकला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ अवघ्या ५५ धावांत आटोपला. खरं तर सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्हीही संघांना फलंदाजी आणि गोलंदाजीची पुरेशी संधी मिळाली. पण, खेळपट्टीवरून वाद रंगला अन् भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टीवरून भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी फलंदाजांचे कान टोचले आहेत. अशातच गावस्करांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते पाकिस्तानातील आवडत्या खेळाडूंबद्दल भाष्य करत आहेत.
गावस्करांनी न्यूलँड्सच्या खेळपट्टीबद्दल बोलताना म्हटले, "अशा खेळपट्टीवर फलंदाजांची मोठी परीक्षा असते. न्यूलँड्सच्या या भेगा पडलेल्या खेळपट्टीवर आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करण्याचे मोठे आव्हान फलंदाजासमोर होते. कसोटी सामन्यांमध्ये खराब खेळपट्टीवर पराक्रम गाजवणं यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी करायला हवी होती. कसोटी क्रिकेट हे असेच आहे, इथे तुम्हाला खूप काही शिकता येते. मला माफ करा, पण इथे जो चांगली कामगिरी करू शकत नाही तो उत्कृष्ट फलंदाज नाही... कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांची परीक्षा असते आणि या स्थितीत तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नसाल तर तुम्ही फलंदाज नाही. जो फलंदाज कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करू शकत नाही तो चांगला खेळाडू बनू शकत नाही."
सुनिल गावस्करांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आवडत्या पाकिस्तानी खेळाडूंची नावं सांगितली. "झहीर अब्बास, इम्रान खान, जावेद मियांदाद आणि वसिम अक्रम हे माजी खेळाडू माझे फेव्हरेट आहेत. तर सध्या बाबर आझम आवडता खेळाडू आहे", असे गावस्करांनी सांगितले.
भारताचा ऐतिहासिक विजयभारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले. या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ गडगडला. केपटाउनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर भारताने प्रथमच यजमान आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली.