मुंबई : वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व गाजवले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडे वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतासह अन्य देशांच्या माजी खेळाडूंनीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ वर्ल्ड कप उंचावेल, असे ठाम मत व्यक्त केले आहे. मात्र, भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांना तसे वाटत नाही. त्यांच्या मते यजमान इंग्लंड संघ हा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
''2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कपचा इतिहास पाहिल्यास यजमान देशांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे इंग्लंडला 2019 मध्ये जेतेपदाची अधिक संधी आहे. घरच्या वातावरणाची त्यांना योग्य जाण असल्यानं त्यांचे पारडे जड आहे,'' असे गावस्कर म्हणाले. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 जूनला सामना होणार आहे.
विश्वकप स्पर्धेपूर्वी सर्व पर्यायांचा विचार करणार : भरत अरुण
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी विश्वचषक स्पर्धेपूर्वी अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रयोग करणे सुरू ठेवणार असल्याचे संकेत देताना मंगळवारी सांगितले की, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी होणाऱ्या लढतीत प्रत्येक पर्यायाचा शोध घेण्यास प्रयत्नशील राहील.’
अरुण म्हणाले,‘विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची रूपरेषा तयार आहे. पण आम्ही या लढतीत प्रत्येक पर्यायाचा वापर करण्यास प्रयत्नशील असू. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या क्रमांकावर विविध खेळाडूंची चाचणी घेत आहोत. विराटने तिसऱ्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली, पण ही एक संधी आहे. चाचणी घेतली तर विविध पर्याय मिळतात.’
'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल'
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याने भारत आणि इंग्लंड हे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले. मात्र त्याचवेळी त्याने विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकायचा असल्यास महेंद्रसिंग धोनीची मदत घ्यावीच लागेल असेही म्हटले. शेन वॉर्न म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मागील वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यात भारत आणि इंग्लंड हे संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील. योग्य संघ निवड केल्यास ऑस्ट्रेलियाही बाजी मारू शकतील, परंतु भारत व इंग्लंड हे फेव्हरिट आहेत.''