Join us  

"भारताच्या पराभवाची अजिबात लाज वाटत नाही, कारण..."; सुनील गावसकरांचं मोठं विधान

भारताच्या पराभवानंतर अनेक दिग्गज आपली मतं व्यक्त करत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:32 AM

Open in App

World Cup 2023 Final IND vs AUS: भारतीय संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात भारताला विश्वचषक २०२३ मध्ये तब्बल ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. भारतासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीला ऑस्ट्रेलियाचा डाव थोडासा गडबडला. पण त्यानंतर ट्रेव्हिस हेडने भारताला रडवले. शतकी खेळी करत त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारताच्या पराभवानंतर अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया विशेष ठरली.

काय म्हणाले गावसकर?

"भारताच्या पराभवामुळे मी दु:खी आहे. मला हे सांगण्यात काहीच गैर वाटत नाही. आपण पराभूत झालो असलो तरी या भारतीय संघाचा मला अभिमान आहे. काही वेळा सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागत नाही, पण तरीही आपला संघ खूप चांगला खेळला. मला खरंच या भारतीय संघाचा प्रचंड अभिमान आणि गर्व आहे. भारताच्या पराभवाची अजिबात लाज वाटायला नको कारण आपण एका तुल्यबळ आणि बलशाली संघाविरोधात पराभूत झालो आहोत. फायनलच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ खूपच जास्त चांगला खेळला," अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी भारतीय संघाची पाठराखण केली.

२००३ चा बदला भारताला घेता आला नाही! 

२० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून पुन्हा एकदा दुखावले. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया निर्धारित ५० षटकात २४० धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. विराट कोहलीने ५४ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ४७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. २४१ धावांचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी खूप सोपे ठरले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकांत २४१ धावा करत सामना जिंकला आणि सहाव्यांदा वनडे विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसुनील गावसकरआॅस्ट्रेलिया