आयपीएलनंतर लगचेच आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ट्वेन्टी-२० प्रकारातून कर्णधार पदावरुन पायऊतार होणार असल्याचं याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीसाठी ही शेवटची ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ठरणार आहे. विराटनंतर भारतीय ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व कोण करणार याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. यात रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रोहित शर्माच्या नावाला पाठिंबा दिला आहे. रोहित शर्माकडेच भारतीय ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व द्यायला हवं असं ते म्हणाले आहेत. इतकंच नव्हे, तर वर्ल्डकपनंतर कशाला खरंतर या वर्ल्डकप स्पर्धेतच रोहितकडे संघाचं नेतृत्त्व द्यायला हवं, असं रोखठोक मत गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
१७ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. तर पुढील वर्षात आणखी एक ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका चर्चेदरम्यान गावस्कर यांनी महत्त्वाचं विधान केलं. "मला वाटतं रोहित शर्माकडे पुढील दोन वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व द्यायला हवं. कारण एक वर्ल्डकप येत्या महिन्यात होतोय तर दुसरा पुढच्या वर्षी लगेच होणार आहे. सध्या लगेच कर्णधार बदलणं तुम्ही पसंत करणार नाही. पण दोन्ही वर्ल्डकप स्पर्धांसाठी रोहित शर्मालाच माझी पहिली पसंती राहिल", असं सुनील गावस्कर म्हणाले.
संघाचा उप-कर्णधार कोण?गावस्कर यांनी फक्त कर्णधारच नव्हे, तर संघाच्या उप-कर्णधारपदासाठी देखील नाव सुचवलं आहे. "केएल राहुल याला संघाचा उप-कर्णधार झालेलं मला पाहायला आवडेल. त्यासोबतच ऋषभ पंत देखील चांगला पर्याय ठरू शकतो. कारण सध्या तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं ज्या पद्धतीनं नेतृत्त्व करतोय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. सामन्यात त्यानं अत्यंत हुशारीनं गोलंदाजांचा अचूक वापर केला. यातून तो स्मार्ट कर्णधार असल्याचं दिसून येतं. तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अशाच हुशार कर्णधाराची गरज असते की जो ऐनवेळी अचूक निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे उप-कर्णधारपदासाठी राहुल आणि पंत हे दोन योग्य पर्याय मला दिसतात", असं गावस्कर म्हणाले.