Sunil Gavaskar on Shreyas Iyer : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल मत व्यक्त केलं. श्रीलंका मालिकेत गावसकर यांना एका खेळाडूची फलंदाजी विशेष भावली. श्रीलंका मालिकेत भारताने २-० असे निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय खेळाडूंची फलंदाजी. टीम इंडियाने दोन्ही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारली. त्यांच्या खेळाचं भरपूर कौतुक झालं. त्यापैकी गुलाबी चेंडूच्या कसोटीत एकाच सामन्यात दोन अर्धशतकं ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरचं गावसकरांनी तोंडभरून कौतुक केलं.
"श्रेयस अय्यर हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यासारखी फलंदाजी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तो जसं खेळतो त्याप्रमाणे खेळणारा खेळाडू नक्कीच यशस्वी होतो. श्रेयस अय्यरची फलंदाजीची शैली खूपच आकर्षक आहे. त्याच्या भात्यात अनेक दमदार फटके आहेत. तो चांगली फलंदाजी करू शकतो हे त्याने वारंवार दाखवून दिलं आहे. चांगला फलंदाज बनण्याचे अनेक गुण त्याच्यात आहेत हे त्याने वेळीवेळी सिद्धही केलं आहे. त्यामुळे सहा ते आठ महिन्यांमध्ये श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा एक बडा खेळाडू म्हणून नावारूपास येईल", असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. त्यावेळी अय्यरने एकाकी झुंज देत ९२ धावा केल्या. दुर्दैवाने त्याचं शतक हुकलं. पुढच्या डावातही त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात एकाच सामन्यात दोन अर्धशतकं झळकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
Web Title: Sunil Gavaskar says Shreyas Iyer will be the Next big thing of indian cricket in next 6 to 8 months
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.