Join us  

"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी तमाम भारतीयांची इच्छा बोलून दाखवली

आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 5:18 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिलक वर्माची सरप्राईज निवड करण्यात आली तर अय्यर-राहुल यांचं पुनरागमन झालं. भारतीय संघाचे दिग्गज सुनिल गावस्कर यांनी एक मोठं विधान करून आगामी दोन मोठ्या स्पर्धांबद्दल भाष्य केलं. तसेच आशिया चषक जिंकणं महत्त्वाचं आहे पण विश्वचषक उंचावणं हे लक्ष्य असल्याचं गावस्करांनी नमूद केलं. 

लोकेश राहुलबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, राहुल किती तंदुरूस्त आहे हे माहित नाही. पण, संघ व्यवस्थापनाला राहुलला विश्वचषकाच्या संघात घ्यायचं असेल म्हणूनच मला वाटतं की, त्यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची निवड केली. भारताच्या सामन्यासाठी अजून ११ दिवस बाकी आहेत. किरकोळ दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ आहे. राहुलने मागील काळात भारतीय संघासाठी जे काही केलं आहे, त्याच्या जोरावर सावरण्याची संधी देणं योग्य ठरेल. 

विश्वचषक जिंकणं हे लक्ष्य असायला हवं - गावस्कर 

भारत आशिया चषक आणि वन डे विश्वचषक जिंकेल का? असं विचारलं असता गावस्करांनी म्हटलं, "होय, आपली बाजू मजबूत आहे. आशिया चषकासाठी चांगला संघ निवडला आहे. विश्वचषकासाठी १५ सदस्य निवडायचे आहेत. तुम्ही जेव्हा भारतासाठी खेळता तेव्हा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आशिया चषक ही एक मोठी स्पर्धा आहे. पण, विश्वचषक जिंकणं ही वेगळी गोष्ट असून आशिया चषक जिंकून त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मोठे लक्ष्य पाहावे लागेल. जर टीम इंडियानं आशिया चषक जिंकला, तर खूप चांगलं पण विश्वचषक जिंकण्याचं लक्ष्य असलं पाहिजे."

३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर १९ सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेनंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होईल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात २ सप्टेंबर तर विश्वचषकात १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,  

राखीव खेळाडू - संजू सॅमसन

टॅग्स :सुनील गावसकरएशिया कप 2022वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुल
Open in App