sunil gavaskar on team india । नवी दिल्ली : भारतीय संघाने (Indian Cricket Team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडमुळेच भारताला अंतिम फेरीत स्थान मिळाले, असा भारतासह जगभरातील अनेक चाहत्यांचा मानस आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आक्रमक भूमिका घेत न्यूझीलंडचे आभार मानण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. गावस्करांनी म्हटले की, भारताने न्यूझीलंडचे आभार मानू नये. कारण मागील दोन वर्षांत उत्कृष्ट क्रिकेट खेळल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेच सुरू होती. परंतु दुसरा क्रमांक गाठण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडमधील दोन्ही कसोटी जिंकणे आवश्यक होते आणि अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहणे आवश्यक होती. भारताच्या पराभवावर देखील खूप काही अवलंबून होते. मात्र, न्यूझीलंडने तसे होऊ दिले नाही आणि पहिल्याच कसोटीत श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर पराभूत करून भारताचा मार्ग सोपा केला. श्रीलंकेचा पराभव होताच भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना जिंकून भारताची मदत केली. याबाबत सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना एक मोठे विधान केले आहे.
सुनिल गावस्करांचं मोठं विधान न्यूझीलंडच्या विजयानंतर गावस्कर यांनी म्हटले, "मला वाटत नाही की भारतावर कोणाचे कर्ज आहे. न्यूझीलंडचा विजय झाला, ठीक आहे, हे न्यूझीलंड क्रिकेटसाठी चांगले आहे, पण मला वाटत नाही की भारत न्यूझीलंडचे आभार मानण्यासाठी बांधील आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 पासून गेल्या दोन वर्षांत भारताने खूप चांगले क्रिकेट खेळले आहे. म्हणून भारतीय संघ कोणाच्याही मदतीने नाही तर स्वबळावर अंतिम फेरीत पोहोचण्यास पात्र ठरला आहे."
भारतीय संघ मागील वेळी देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला होता, ज्यामध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"