Join us  

Sunil Gavaskar, IND vs SL 2nd Test: "टीम इंडियाचा हा गोलंदाज म्हणजे 'लंबी रेस का घोडा"; सुनील गावसकर यांनी केलं कौतुक

तो गोलंदाज इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, हेदेखील त्यांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:48 AM

Open in App

IND vs SL 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील Pink Ball Test मध्ये भारताचा पहिला डाव २५२ धावांत आटोपला. तर पहिल्या दिवसाअखेर श्रीलंकेने ८६ धावांत ६ बळी गमावले. गोलंदाजीला पोषक अशा खेळपट्टीवर भारताकडून श्रेयस अय्यरने दमदार ९२ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही. दोन्ही संघांचे गोलंदाज मात्र चांगलेच चमकले. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारताला अडीचशे धावांत गुंडाळलं. तर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी लंकेची अवस्था त्याहून वाईट केली. भारताच्या एका गोलंदाजाला लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी 'लंबी रेस का घोडा' अशी उपमा दिली.

"तो हा एक असा गोलंदाज आहे जो दीर्घ काळ समान गतीने गोलंदाजी करू शकतो आणि फलंदाजांवर दबाव निर्माण करू शकतो. तो अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे. प्रत्येक संघात असा एक माणूस असणं आवश्यकच असतं. क्रिकेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की संघाकडे एक तरी वेगवान गोलंदाजी करणारा आणि मोठ्या स्पेल टाकणारा गोलंदाज हवाच. साध्या ४ षटकांच्या नव्हे तर ६-७ षटकांच्या स्पेल टाकणाऱ्या गोलंदाजाची प्रत्येक संघाला गरज आहे आणि मोहम्मद शमी हा तो 'लंबी रेस का घोडा' आहे", असं गावसकरांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं.

"त्याचा गोलंदाजीचा रन अप पाहा. तो वेगाने धावत येतो. मनगटाच्या हालचालींवर तो चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो. त्यामुळे त्याची गोलंदाजी समजणं आणि त्यावर फलंदाजी करणं फारसं सोपं नाही. खेळ कसाही असला तरी अशा गोलंदाजाला खेळणं आणि आपल्या धावा करत राहणं ही खूप कठीण काम असतं", असंही गावसकर म्हणाले.

सध्याची भारतीय गोलंदाजी सर्वोत्तम आहे. नव्या चेंडूने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी उत्तम गोलंदाजी करतात. सिराजसारखा वेगवान गोलंदाज आणि इशांत शर्मासारखा अनुभवी खेळाडू संघात आहे. आणि उमेश यादवचा पर्यायही तितकाच प्रभावी आहे. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी सध्या सुस्थितीत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासुनील गावसकरमोहम्मद शामीजसप्रित बुमराह
Open in App