सूरत : सचिन हे कानावर पडताच भारतीयांच्या डोळ्यासमोर येतो तो मास्टर ब्लास्टर तेंडुलकर... महान, दिग्गज, 'क्रिकेटचा देव' अशा विविध नावांनी ओळखला जाणारा सचिन म्हणजे जणू काही क्रिकेटची ओळखच. भारतात लहानग्याला क्रिकेट खेळताना त्याच्या आईने पाहिले की अचानक त्या माऊलीच्या तोंडी सचिनचं नाव येतं हे साहजिक आहे. आपल्या मास्टर ब्लास्टरला तमाम भारतीयांनी भरभरून प्रेम दिलं. क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे शतक झळकावणारा सचिन म्हणजे अनेकासांठी प्रेरणा... पण, भारतात सचिन नावाचे रेल्वे स्थानक आहे हे कुणी सांगितलं तर ते आपल्याला वेगळं वाटेल. पण होय, हे खरं असून भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी याचा दाखला देखील दिला आहे.
दरम्यान, सुनिल गावस्कर यांनी सचिन नाव असलेल्या रेल्वे स्थानकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. गुजरातमधील सूरत शहराजवळील या रेल्वे स्थानकाला आता अनेक लोक महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावाशी जोडत आहेत. मात्र, या रेल्वे स्थानकाच्या नावाचा आणि तेंडुलकरच्या नावाचा काहीही संबंध नाही. हे स्थानक गेल्या शतकापासून अस्तित्वात आहे, जे योगायोगाने सचिनशी जोडले जात आहे. महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी या स्थानकाचे नाव देणार्या लोकांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली आहे. तसेच त्यांनी या स्थानकाचा संबंध क्रिकेटच्या महान सचिनशी जोडला.
गावस्करांनी सोशल मीडियावर 'सचिन' रेल्वे स्थानकाजवळील त्यांचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी या स्थानकाच्या नावावरून एक खास संदेशही लिहला. "गेल्या शतकातील लोकांची किती चांगली दूरदृष्टी होती की त्यांनी आमच्या खेळातील सर्वकालीन महान आणि माझ्या आवडत्या क्रिकेटर व्यक्तीच्या नावावर सूरतजवळील या रेल्वे स्थानकाला हे नाव दिले", असे गावस्करांनी कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले. गावस्करांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आपली मतेही मांडली आहेत, त्यापैकी काहींनी सांगितले की, हे सचिन स्थानक सूरतजवळ आहे, जे आज एक औद्योगिक शहर बनले आहे. परंतु त्याला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आलेले नाही. हा केवळ एक योगायोग आहे.