Sunil Gavaskar on MS Dhoni, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर चांगलेच संतापले. रविवारी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पंजाब किंग्जविरुद्ध ५४ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. याआधी चेन्नईचा संघ कोलकाता आणि लखनौकडूनही प्रत्येकी एक सामना हारला आहे. रविवारी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर सुनील गावसकर यांनी जाहीरपणे CSKच्या महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) पराभवासाठी गुन्हेगार ठरवलं.
चेन्नई सुपर किंग्जच्या या लाजिरवाण्या कामगिरीसाठी सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंग धोनीला सर्वात मोठा दोषी मानलं. महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात २८ चेंडूत २३ धावांची संथ खेळी खेळली. त्याच्या संथ खेळीमुळे चेन्नईला धावगती कायम राखणं शक्य झालं नाही. याशिवाय, पंजाब किंग्जच्या डावातील आठव्या षटकात चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज प्रिटोरियसच्या चेंडूवर लियम लिव्हिंगस्टोनचा झेल धोनीने सोडला. लियम लिव्हिंगस्टोनचा झेल सोडणं चेन्नई सुपर किंग्जला बरंच महागात पडलं. लियम लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा करून बाद झाला.
या सामन्यानंतर सुनील गावसकर म्हणाले, "धोनी हल्ली जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा मोठे शॉट्स खेळत नाही. आधी तो एक-दोन धावा काढत राहायचा आणि गोलंदाजांवर दबाव टाकत राहायचा. पण या सामन्यात तो तसं करू शकला नाही. तिथूनच CSKच्या पराभवाला खरी सुरूवात झाली. शिवम दुबेने खुप चांगली फटकेबाजी केली. पण धोनीने त्याला हवी तशी साथ दिली नाही", असं रोखठोक मत गावसकरांनी मांडलं.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला रविवारी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात ५४ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ १२६ धावांतच बाद झाला. त्यामुळे पंजाबने ५४ धावांनी सामना जिंकला.