मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि त्यानंतर सातत्याने निवड समिती टीकेची धनी ठरत आहे. करुण नायरला वगळल्यामुळे निवड समितीला रोष ओढवून घ्यावा लागला आहे. आतातर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर निवड समितीवर बरसले आहेत.
निवड समितीने फक्त करूणला या मालिकेसाठी वगळलेले नाही, तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनाही संघात स्थान दिलेले नाही. भुवनेश्वरला पाठिच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळता आली नव्हती. त्याने नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत संघात पुनरागमन केले होते. बुमरालाही दुखापतीमुळे इंग्लंडमधील काही सामन्यांना मुकावे लागले होते. आता ते दोघे फिट असले तरी त्यांना संघात मात्र स्थान देण्यात आलेले नाही.
निवड समितीवर टीका करताना गावस्कर म्हणाले की, " भुवनेश्वरने आशिया चषकात पुनरागमन केले आहे. बुमराही काही दिवसांपूर्वीच फिट झाला आहे, असे असताना त्यांना संघात स्थान का देण्यात आलेले नाही? जर या दोघांनी विश्रांती घेण्याचे ठरवले असेल तर ठिक आहे, पण कसोटी संघात त्यांना स्थान द्यायलाच हवे. जर या दोघांना एकदिवसीय संघातून बाहेर काढेल असते तर ती गोष्ट पटली असती. कारण कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूकडे अनुभव असणे गरजेचे असते. "