Sunil Gavaskar slams Virat Kohli आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या संघाचा पराभव झाला. या सामन्यातील चौथ्या डावात अश्विनच्या गोलंदाजीवर आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याला पायचीत बाद ठरवण्यात आले होते. पण DRS मध्ये चेंडू जास्त उसळी घेताना दिसला आणि फलंदाजाला जीवनदान मिळाले. आफ्रिकेची खेळपट्टी पाहता इतकी फिरकीपटूला इतकी उसळी मिळणं शक्य नसल्याचं भारतीय खेळाडूंचं मत होतं. त्यामुळे विराट कोहलीने थेट स्टंप माईकजवळ जाऊन प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या सुपरस्पोर्ट चॅनेलवर टीका केली. त्याच मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटला सुनावलं.
"जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता.. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असता, तेव्हा चिडचिड होणं किंवा राग येणं स्वाभाविक आहे. पण जे विराट बोलला ते तो चालता-चालता बोलला असता तर गोष्ट वेगळी होती. त्याने थेट स्टंप माईकच्या जवळ जाऊन तसं विधान केलं. तुम्ही एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करताना हे योग्य नाही. कारण अशावेळी तुम्ही जे बोलता ते स्पष्टपणे ऐकू जातं आणि त्याचा परिणाम फार विचित्र होतो. अशा वेळी ही गोष्ट टाळता येऊ शकते", असं गावसकर म्हणाले.
गावसकर पुढे म्हणाले, "खेळाच्या मैदानावर बरेच वेळा खेळाडू आक्रमक होतात. त्यात काहीच नवीन नाही. फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो... खेळाडू आक्रमक होतात, भांडणंदेखील होतात. त्यावेळी ते खेळाडू मुद्दाम असं वागतात असं मला मूळीच म्हणायचं नाही. पण एका गोष्टीचा विचार करा की जेव्हा भारतात सामना खेळवला जात असतो आणि त्यावेळी जर विदेशी संघाचा कर्णधार स्टंप माईकच्या जवळ जाऊन टेलिव्हिजन चॅनेलला असं काही बोलला असता तर भारतीयांना कसं वाटलं असतं? भारतीयांनी नक्कीच ते स्वीकारलं नसतं", असं म्हणत गावसकरांनी विराटला आरसा दाखवला.
दरम्यान, त्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. आफ्रिकेने चौथ्या दिवशी कसोटी जिंकत मालिका २-१ने खिशात घातली. विराटच्या त्या वर्तणुकीबाबत त्याला दंड किंवा कारवाई केली जावी असं अनेक आजी माजी खेळाडूंनी मत व्यक्त केलं. मात्र, अद्याप विराटवर कारवाई झालेली नाही.
Web Title: Sunil Gavaskar slams Virat Kohli over Stump Mic Controversy IND vs SA Test Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.