( Marathi News ) विराट कोहली व रोहित शर्मा यांचे १४ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर हे रोहित, विराट यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळावे यासाठी आग्रही आहेत. पण, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणास्तव खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि यशस्वी जैस्वाल मोहालीत रोहितसह सलामीला खेळताना दिसेल.
कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना
विराट कोहली दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यासाठी संघात परतणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे. त्यामुळे रोहित व विराट यांच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारतीय खेळाडू त्यानंतर आयपीएल २०२४ खेळणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये रोहित व विराट यांची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही, तर या सीनियर खेळाडूंसाठी गावस्करांनी बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे.
"मला वाटते की आयपीएलचा फॉर्म महत्त्वाचा असेल कारण तो ताजा फॉर्म असेल. अफगाणिस्तान मालिका जानेवारीमध्ये आहे. वर्ल्ड कप जूनमध्ये आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये कोणाचा फॉर्म चांगला असेल, त्या कामगिरीचा आधी विचार केला पाहिजे. त्याबरोबरच मी हेही म्हणेन की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जरी आयपीएलमध्ये साधारण कामगिरी केली, त्यांनी तिथे १४ पैकी ५ सामन्यांत मोठ्या धावा केल्या, तरी त्यांना वर्ल्ड कप संघात घ्यायला हवं. तुम्ही प्रत्येक सामन्यात धावा करू शकत नाही. तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल,” असे गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले.
भारतीय कर्णधार रोहित आयपीएल २०२४मध्ये मुंबई इंडियन्स (MI) मध्ये फलंदाजाची भूमिका निभावणार आहे. रोहितच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याची मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे. कोहलीने याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या नेतृत्वाच्या भूमिकेतून मुक्त झाला होता. कोहली आणि रोहित यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवडकर्त्यांकडे दुर्लक्षित केल्यास ते भारताच्या डगआऊटमध्ये तरी असावे, असा सल्लाही गावस्कर यांनी दिला. "एक आउट-ऑफ-द-बॉक्स सूचना आहे, जर तुम्ही त्यांना त्यांच्या अनुभवामुळे संघात निवडू शकत नसाल तर तुम्ही त्यांना संघासोबत घेऊन जाऊ शकता. जर रोहित शर्मा आणि विराट कोहली डगआऊटमध्ये आहे, कल्पना करा की संघाचा आत्मविश्वास कसा असेल,” असे गावस्कर पुढे म्हणाले.