Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs SL Test Series : टीम इंडिया ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा यासारख्या अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नवा कसोटी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. पुजारा आणि रहाणे संघात नसताना एक नवीन फलंदाजीचा क्रम निवडण्याचे आव्हान रोहितसमोर असणार आहे. या मुद्द्यावर भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आपलं मत स्पष्ट केलं.
अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर बसवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयानंतर गावसकर यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. सुनील गावसकर यांच्या मते तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी विराट कोहलीने यायला हवे. "सध्याच्या घडीला नीट विचार केला तर विराट कोहली तीन नंबरवर खेळला पाहिजे. कारण तुमचा सर्वोत्तम फलंदाज हा कायम तिसऱ्या नंबरवर खेळतो. रिकी पॉंटिंग तिसऱ्या नंबरवर खेळायचा. जो रूट आता चौथ्या नंबरवर खेळतो पण विंडीजविरुद्ध तो तीन नंबरवर खेळेल. तुमचा सर्वोत्तम फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर असण्याचा एक फायदा असतो. जर पहिली विकेट लवकर गेली तर तीन नंबरचा खेळाडू डाव सावरू शकतो" , असं गावसकर यांनी सांगितलं.
"विराट हा एक उत्तम फलंदाज आहे. जलदगतीने धावा करण्याची कला त्याला अवगत आहे. अनुभवी खेळाडू संघात नसताना विराट हा तिसऱ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल", असे गावसकर म्हणाले.
विराटला ४ नंबरवरच कायम ठेवायचं असल्यास...
विराट कोहली हा चौथ्या क्रमांकावर बरेच वर्ष खेळतो आहे. त्यामुळे त्यात बदल न करण्याचा निर्णय जर संघ व्यवस्थापन घेत असेल तर तीन नंबरवर भारताकडे हनुमा विहारी हा एक पर्याय आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती", अशी आठवण गावसकर यांनी करून दिली.