२०२१ नंतर पुन्हा २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाला आज ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी भारतीय फलंदाजांची शाळा घेतली.
“आजची फलंदाजी ढासळली. आज आपण जे पाहिले ते केवळ हास्यास्पद होते. विशेषतः शॉट मेकिंग. पुजाराकडून आम्ही काल काही सामान्य शॉट्स पाहिले, तो असा शॉट खेळेल याची कोणीही अपेक्षा केली नाही. कदाचित कुणीतरी डोक्यात जाऊन ‘स्ट्राइक रेट, स्ट्राइक रेट’ म्हटलं असेल. आपण एक सत्र देखील टिकलो नाही. एका सत्रात ८ विकेट्स पडल्या,” असे स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले.
विराट कोहलीच्या बाद होण्यावर ते म्हणाले, ‘तो एक सामान्य शॉट होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. त्याला अर्धशतक गाठण्यासाठी एका धावेची गरज आहे याची जाणीव होती. जेव्हा तुम्ही माईलस्टोनचा विचार करता तेव्हा हे घडते. अजिंक्य रहाणे ४६ धावांवर खेळत होता. त्याने इतका वेळ जो शॉट खेळला नव्हता तो अचानक का खेळला? कारण तुम्हाला वैयक्तिक विक्रम खुणावत होते,” असेही ते म्हणाले.
कोहलीची शाळा घेत ते म्हणाले, “तो एक वाईट शॉट होता. तो कोणता शॉट खेळला हे तुम्ही कोहलीला विचारायला हवे. तो सामना कसा जिंकायचा याबद्दल खूप बोलतो ज्यासाठी तुम्हाला दीर्घ खेळीची आवश्यकता आहे. तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर इतका लांब चेंडू खेळलात तर ते कसे कराल?”
सुनील गावस्कर म्हणाले, "आम्ही आता वेस्ट इंडिजला जात आहोत, आम्ही त्यांना २-० किंवा ३-० अशी धुळ चारू, हे महत्त्वाचे नाही कारण तो सर्वोत्तम संघ नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मोठ्या फायनलमध्ये काय झाले ते सर्वात महत्त्वाचे आहे.