मुंबई : जूनमध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक रंगणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघ बाजी मारेल, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतापुढे यजमान इंग्लंडचे आव्हान असेल, असेही गावस्कर यांनी म्हटले आहे.
गावस्कर म्हणाले की, " गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघ चांगली कामगिरी करतो आहे. भारताकडे सर्वात चांगला गोलंदाजीचा तोफखाना आहे. भारताचे गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर बळी मिळवू शकतात, हे त्यांनी यापूर्वीही बऱ्याचदा दाखवून दिले आहे. त्यामुळे या विश्वचषकात भारताला जेतेपद पटकावण्याची नामी संधी आहे."
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडमध्ये आतापर्यंत घवघवीत यश मिळवता आलेले नाही. भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांना मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे कोहली इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकणार का, याबाबत काहींच्या मनात साशंकता होती. पण ही शंका आता गावस्कर यांनी दूर केली आहे.
गावस्कर म्हणाले की, " विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतापुढे इंग्लंडचे आव्हान असू शकते. कारण इंग्लंडचा संघ चांगलाच समतोल आहे आणि त्यांच्या संघात चांगला समन्वय पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये विश्वचषकाटा अंतिम सामना होईल, असे मला वाटते."
आयपीएलच्या कामगिरीवर विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहू नका - विराट कोहली‘आयपीएलमधील कामगिरी विश्वचषक संघाच्या निवडीसाठी उपयुक्त ठरेल, असा कुणी समज करून घेऊ नये. असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असेल,’ असे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहली म्हणाला, ‘आयपीएलच्या कामगिरीचा विश्वचषकावर काही प्रभाव पडेल, असे वाटत नाही. विश्वचषकासाठी निवड करताना आयपीएलची कामगिरी विचारात घेतली जाणार नाही, असे माझे मत आहे. आम्हाला तगडा संघ हवा आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्याआधी अखेरच्या दोन स्थानासाठी खेळाडूंचा शोध घेऊ. ऋषभ पंतला काही सामने खेळण्याची संधी दिली जाईल, पण एक गोलंदाज कमी खेळविण्याच्या अटीवर असे करणार नाही. संघ नियोजनाचा देखील विचार केला जाईल. संघाचा ताळमेळ कायम राखून ज्यांना संधी द्यायची आहे, त्यांना खेळविता येईल.’