Sunil Gavaskar Trolled, Sachin Tendulkar: भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर अनेकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. बांगलादेश दौऱ्यावर नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत त्यांनी एका स्टार क्रिकेटरबद्दल विधान केले. भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिक याची दमदार कामगिरी चाहत्यांसह साऱ्यांनाच भावली. त्यानंतर सुनील गावसकर यांनी उमरान मलिकचे तोंडभरून कौतुक केले होते. त्याच्यावर स्तुतिसुमने उधळताना सुनील गावसकर यांनी एक महत्त्वाचे ट्विट केले. त्या ट्विटमध्ये भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचाही उल्लेख करण्यात आला होता. पण गावसकरांचे हे ट्विट चाहत्यांना अजिबातच रूचले नाही. त्यामुळे गावस्कर यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले.
नक्की काय म्हणाले गावसकर?
टीम इंडियाचा युवा गोलंदाज उमरान मलिकने अलीकडेच बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करून आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर हेदेखील त्याचे फॅन झाले आणि त्यांनी उमरान मलिकची स्तुती केली. सुनील गावसकर यांनी एक विधान केले होते, त्यात ते वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे केवळ कौतुकच करत नव्हते तर ते म्हणाले की सचिन तेंडुलकर नंतर उमरान मलिक हा दुसरा क्रिकेटपटू आहे, ज्याला भारताकडून खेळताना पाहण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे.
सुनील गावसकर यांनी उमरानचे कौतुक केले पण त्याची तुलना सचिनशी करण्यात आल्याने चाहते निराश झाले आणि आता गावसकर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. एक युजर म्हणाला की सुनील गावसकरजी, आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. सचिन आमच्यासाठी क्रिकेटचा देव आहे. त्यामुळे त्याचा सारखा दुसरा कोणी होऊच शकत नाही. दर एकाने लिहीले की सुनील गावसकरांनी मांडलेले मत एकदम चूक आहे. याच दरम्यान, काहींनी गावसकरांची पाठराखणही केली. सुनील गावसकरांना असे म्हणायचे आहे की सचिन तेंडुलकरचे पदार्पण होण्याआधी ज्या प्रकारची हवा तयार झाली होती, तसेच उमरानच्या वेळी घडले अशा शब्दांत एका युजरने गावसकरांची बाजू घेत संतप्त नेटकऱ्यांना समजावले.