India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना रांची येथे सुरू आहे. भारतीय संघाला विजयासाठी आणखी १५२ धावा करायच्या आहेत. यानंतर दोन्ही संघ पाचव्या कसोटीसाठी धर्मशाला येथे दाखल होणार आहेत. हा सामना आर अश्विन ( R Ashwin) याच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना आहे. हा सामना आणखी संस्मरणीय करण्यासाठी भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी एक कल्पना सुचवली आहे.
ते म्हणाले, ''माझ्या मते आज भारतीय संघ मालिका विजय निश्चित करेल आणि त्यानंतर टीम इंडिया मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धर्मशालामध्ये खेळेल. मला विश्वास आहे की धर्मशाला कसोटीत रोहित शर्मा अश्विनला जबाबदारी सांभाळण्याची संधी देईल. अश्विनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे काही केले आहे ते लक्षात घेता हा विशेष सन्मान असेल.''
अश्विननेही गावस्करांच्या या कल्पनेवर उत्तर दिले की,''सनी भाई (सुनील गावस्कर) तुम्ही खूप उदार मनाचे व्यक्ती आहात. याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि मला वाटते की मी या सर्व गोष्टींपेक्षा खूप पुढे गेलो आहे. या संघासोबत आतापर्यंत घालवलेल्या क्षणांचा मी आनंद घेत आहे. हा प्रवास जितका मोठा असेल तितका मला आनंद होईल.''
अश्विनने मोडला अनिल कुंबळे यांचा विक्रमअश्विन सध्या रांचीच्या मैदानावर कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील ९९ वा सामना खेळत आहे . ज्यामध्ये त्याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने भारतीय खेळपट्टीवर ३५४ विकेट्सचा टप्पा ओलांडला आणि अनिल कुंबळे यांचा ३५० विकेट्सचा विक्रम मोडला. अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले, परंतु मागील १० वर्षांत भारताला फक्त एकदाच चौथ्या डावात १५०+ ( गॅबा कसोटी) धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे.