चेन्नई : चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी भारतीय संघावर इंग्लंडकडून २२७ धावांनी दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. जेम्स ॲन्डरसनच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे २०१२नंतर देशात प्रथमच कसोटी पराभवास सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र, अश्विनचा अपवादवगळता एकाही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंडचे खेळाडू डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळताना अडखळतात म्हणून कुलदीप यादव याला डावलून नवख्या शाहबाज नदीमला संघात स्थान देण्यात आले होते. विराटच्या या निर्णयावर दिग्गजांनी नाराजी व्यक्त करीत टीका केला होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला स्थान देण्याचा मोलाचा सल्ला माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला दिला आहे.‘वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या सामन्यातून वगळणे कठीण आहे. कारण, गोलंदाजीत अपयशी ठरला असला तरी पहिल्या डावात त्याने महत्त्वपूर्ण ८५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सुंदरचे संघातील स्थान अबाधित राहू शकते. दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला संघात घ्यायचे आणि कोणाला वगळायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. नदीम की सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची, हे त्यांनी ठरवावे; पण कुलदीपला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळायला हवे,’ असे माझे मत असल्याचे गावसकर यांनी सांगितले. पाचव्या दिवशी ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. दुसरा डाव केवळ १९७ धावात संपुष्टात आला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England: कुलदीप यादवला खेळवा; सुनील गावसकर यांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला
India vs England: कुलदीप यादवला खेळवा; सुनील गावसकर यांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला
India vs England: पहिल्या सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र, अश्विनचा अपवादवगळता एकाही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:31 AM