भारतीय संघाचे माजी क्रिकेटर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित अँण्ड कंपनीला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
याआधी बांगलादेशच्या संघाने टीम इंडियाला दिली होती कडवी टक्कर
बांगलादेशच्या संघाने भारत दौऱ्यावर येण्याआधी पाकिस्तानच्या संघाला त्यांच्या घरात २-० असे क्लीन स्वीप केले आहे. याच दौऱ्याचा दाखला देत गावसकरांनी टीम इंडियाला या संघाला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असा सल्ला दिला आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशच्या संघाने ढाका येथील मैदानात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अडचणीत आणले होते. त्यावेळी श्रेयस अय्यर आणि अश्विनमुळे टीम इंडियान बांगलादेशला भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्यापासून रोखले होते. याचा उल्लेखही त्यांनी केलाय.
पाक विरुद्ध ताकद दाखवली, आता ते टीम इंडियाला धक्का देण्यासाठी उत्सुक
गावसकरांनी मिड-डेसाठी लिहिलेल्या स्तंभ लेखातून टीम इंडियाला सावध केले आहे. त्यांनी लिहिलंय की, ‘पाकिस्तानमध्ये खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करुन आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन वर्षां पूर्वी ढाका कसोटीत त्यांनी टीम इंडियाला कडवी टक्कर दिली होती. आता पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आता ते भारतीय संघाला शह देण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
ते संघ बघून घाबरणाऱ्यातले नाहीत
त्यांनी पुढे लिहिलंय की, ‘त्यांच्याकडे (बांगलादेशच्या संघात) काही सर्वोत्तम खेळाडू आहेत. एवढेच नाही तर युवा खेळाडूंनीही प्रभावित केले आहे. ते विरोधी संघ बघून घाबरणाऱ्यातले नाहीत. इथूनं पुढे कोणताही संघ त्यांना (बांगलादेश संघ) घेणार नाही. कारण बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानला कसोटी मालिकेत २-० असा धुव्वा उडवला आहे.
भारतासाठी आगामी १० कसोटी सामने आहेत खूप महत्त्वाचे
भारतीय संघ पुढच्या ४ महिन्यात १० कसोटी सामने खेळणार आहे. यात बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसह न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघ घरच्या मैदानात खेळताना दिसेल. त्यानंतर मात्र भारतीय संघासमोर पुन्हा एकदा मोठी कसोटी असेल. कारण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारतीय संघ तिसऱ्या हंगामातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यती सध्या आघाडीवर आहे. आपलं हे अव्वलस्थान भक्कम ठेवण्यासाठी उर्वरित कसोटी सामन्यात अधिकाधिक विजय मिळवणं गरजेचे आहे.