Jasprit Bumrah, Sunil Gavaskar Warning Team India: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह T20 World Cup 2022 स्पर्धेला मुकणार असल्याचे पक्के झाले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपमध्ये तो खेळू शकणार नाही, यावर BCCI ने दोन दिवसांपूर्वी अधिकृतरित्या ट्वीट करून शिक्कामोर्तब केले. गेले काही दिवस बुमराह विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल साशंकता होती. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दोघांनीही, टी२० वर्ल्डकपला अजून वेळ आहे असं सांगत, जसप्रीत बुमराह खेळेल की नाही हे सांगणे टाळले होते. पण अखेर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाच खऱ्या ठरल्या आणि बुमराहला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्यानंतर आता जसप्रीत बुमराह नसलेल्या टीम इंडियाला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एक 'वॉर्निंग' दिली आहे.
काय म्हणाले गावसकर-
जसप्रीत बुमराह वर्ल्डकप खेळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत त्याची उणीव नक्कीच भासेल याबाबत शंका नाही. टीम इंडियातील सर्व वेगवान गोलंदाजांचा मान ठेवून मी असे म्हणतो की जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकेल असा एकही खेळाडू सध्या भारताकडे नाही. जसप्रीत बुमराहची क्षमता काही औरच आहे. बुमराह जेव्हा कमबॅक करून संघात आला आणि त्याने दोन सामने खेळले, त्याच वेळी तो किती प्रभावी गोलंदाजी करू शकतो हे दिसून आले. त्याच्या गोलंदाजीचा फायदा इतर गोलंदाजांच्या माऱ्यावर साफ दिसून आला", असे गावसकर म्हणाले.
गावसकरांनी दिली ताकीद
याच वेळी गावसकरांनी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषकासाठी वॉर्निंग दिली. "जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त होण्याआधीच त्याला मैदानात उतरवण्याची घाई करण्यात आली असे बोलले जात आहे. यावरून विविध मते असू शकतात. पण सध्याची सत्यपरिस्थिती अशी आहे की बुमराहची संघातील अनुपस्थिती हा भारतासाठी विश्वचषक स्पर्धेत फार मोठा धक्का असणार आहे. दीपक चहर आणि युवा गोलंदाज अर्शदीप सिंग हे दोघे चांगली कामगिरी करत आहेत. त्रिवेंद्रमच्या पिचवर या दोघांनी ज्या प्रकारे गोलंदाजी करत चांगली कामगिरी केली, ती बाब नक्कीच लक्षणीय होती. त्यामुळे बुमराहच्या जागी हे दोघे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतील. पण तरीही ही बाब पूर्णत: भरली जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व वेगवान गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करावीच लागेल," अशी सक्त ताकीद गावसकर यांनी दिली.
Web Title: Sunil Gavaskar warning Team India ahead of T20 World Cup in the absence of Jasprit Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.