Join us  

सुनील गावस्कर लिहितात... कांगारुविरुद्ध फिरकी प्रभावी ठरेल

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पुनरागमन करीत संघाला बलाढ्य बनविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 7:48 AM

Open in App

आयसीसी विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चाहत्यांच्या नजरा निवडक लढतींकडे लागलेल्या आहेत. त्यात भारत- आॅस्ट्रेलिया सामन्याचा समावेश होतो. अलीकडे उभय संघातील प्रतिस्पर्धेत उल्लेखनीय वाढ झालेली दिसते. विश्वचषकाआधी आॅस्ट्रेलिया संघ नाट्यमयरीत्या फॉर्ममध्ये परतला. विशेषत: आपल्याच देशात भारताकडून पहिले दोन सामने गमविल्यानंतर ओळीने तिन्ही सामने जिंकून त्यांनी मालिका खिशात घातली. हीच या संघाची ओळख आहे. मागील काही वर्षांत या संघाच्या कामगिरीत सातत्य नव्हते. कसोटी मालिकेत लंकेकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर भारतात त्यांनी पहिली कसोटी जिंकल्यानंतरही कसोटी मालिका गमावली होती. हीच कथा वन डे क्रिकेटमध्ये कायम होती.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पुनरागमन करीत संघाला बलाढ्य बनविले. स्मिथने संयमी वृत्तीचा परिचय देत विंडीजविरुद्ध दयनीय अवस्थेतून बाहेर काढले. व्यावसायिक असलेला हा संघ गोलंदाजीत संतुलित असल्याने कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर विजय मिळवू शकतो. भारताने विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध दमदार विजयाची नोंद करीत व्यावसायिकतेचा परिचय करून दिला. भारताला इंग्लंडसोबत प्रबळ दावेदारांमध्ये गणले जाते. यादरम्यान संघाला ज्या तीन ‘किलर’ संघांविरुद्ध खेळायचेय, त्यातील एक संघ द. आफ्रिकेचा होता. अन्य दोन संघांत श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश होतो.रोहित शर्मा याने आंतरराष्टÑीय सामन्यात अनेक शतके ठोकली पण यातील काहीच संस्मरणीय शतके आहेत. अशाच संस्मरणीय शतकात द. आफ्रिकेविरुद्ध केलेल्या नाबाद १२२ धावांचा समावेश होतो. कोहली लवकर बाद झाल्यानंतर रोहितने विजयाची जबाबदारी स्वीकारली.बुमराह, कुलदीप आणि चहल यांनी भारतीय मारा भेदक बनविला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये जी कामगिरी केली ती पाहता संपूर्ण स्पर्धेत भारतीय फिरकीवर नजर राहील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्ध फिरकीपट्टूंकडून मला फार अपेक्षा आहेत. आज, रविवारी हवामान देखील आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :सुनील गावसकरवर्ल्ड कप 2019