T20 World Cup 2024 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या लढतीत उद्या आयर्लंडचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, ओपनिंगला कोण येणार, असे विविध प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी भारताने पहिल्या सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरायला हवं, हे सांगितले आहे. विराट कोहली उशीराने न्यूयॉर्क येथे दाखल झाल्याने त्याला सराव सामना खेळता आला नाही आणि बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा व संजू सॅमसन ही जोडी ओपनिंगला आली होती. पण, संजू अपयशी ठरला.
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ गाजवून विराट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवण्यासाठी सज्ज आहे आणि गावस्कर यांनीही विराटने रोहितसह टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करावी असा सल्ला दिला आहे. त्यांनी यशस्वी जैस्वालला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यास सांगितले आहे. यशस्वीला आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. ''रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सलामीला खेळायला हवं, तर यशस्वीने तिसऱ्या क्रमांकावर खेळावं,''असे गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले.
गावस्कर यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजूला वगळून रिषभ पंतला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवडले आहे. जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या रिषभने आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातही रिषभने चांगली फटकेबाजी केली. जलदगती गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराजची निवड त्यांनी केली आहे. फिरकी माऱ्याचा विचार केल्यास गावस्कर यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा व कुलदीप यादव आहेत. याचा अर्थ अक्षर पटेल व युझवेंद्र चहल यांना संधी मिळालेली नाही.
सुनील गावस्कर यांची प्लेइंग इलेव्हन - विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग