- रोहित नाईक
मजबूत गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१६ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या संघाची खासियत म्हणजे, या संघाने १३०-१४० धावांपर्यंतची माफक धावसंख्या जरी उभारली, तरी प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्य गाठताना नाकीनऊ येतात. याचे कारण म्हणजे सनरायझर्स हैदराबादची तगडी गोलंदाजी. एकाहून एक सरस गोलंदाजांचा समावेश असलेल्या हैदराबादविरुद्ध खेळताना प्रत्येक संघाच्या प्रमुख फलंदाजांवर मोठी जबाबदारी येते.
२०१३ सालापासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने पदार्पणातच चौथे स्थान मिळवून आपली क्षमता सिद्ध केली. मात्र यानंतर दोन वर्षे त्यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. २०१६ साली जेतेपद पटकावल्यानंतर हैदराबादने सलग तीन वर्षे बाद फेरी गाठली. यामध्ये २०१८ साली त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा हैदराबादने आपल्या ताफ्यात काही आक्रमक फलंदाजांना समाविष्ट केले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीला केन विलियम्सन, मिशेल मार्श आणि सर्वात महत्त्वाचे जॉनी बेयरस्टॉ यांची साथ असेल. त्याचवेळी, केवळ चार परदेशी खेळाडूंनाच अंतिम संघात खेळविण्याचा नियम असल्याने संघ व्यवस्थापनाची अंतिम संघ निवडताना मोठी कसोटी लागेल.
सर्वोत्तम कामगिरी : २०१६ साली विजेतेपद.
फलंदाजी : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने संघाकडे आक्रमक सलामीवीर असून त्याच्या जोडीला इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टॉ येऊ शकतो. या दोघांनी वेगवान सुरुवात करुन दिल्यास हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात सोपे जाईल. केन विलियम्सन, रिद्धिमान साहा, मिशेल मार्श, मनिष पांड्ये यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल.
गोलंदाजी :
हैदराबादची खरी ताकद गोलंदाजीत असून अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान त्यांचा हुकमी एक्का. तसेच, भुवनेश्वर कुमारचा स्विंग मारा आणि खलील अहमद, संदीप शर्मा यांचा वेगवान माराही लक्षवेधी ठरेल. अफगाणिस्तानचाच मोहम्मद नबीही निर्णायक ठरु शकतो. पण यासाठी संघाला विदेशी खेळाडूंना खेळविण्याचे गणित जुळवावे लागेल.
मुख्य ताकद :
गोलंदाजी. राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या वर संघाची मोठी मदार. तसेच वॉर्नर, विलियम्सन यांची फटकेबाजी ठरेल निर्णायक. पियम गर्ग आणि अब्दुल समद हे युवा खेळाडू संघासाठी ट्रम्प कार्ड ठरतील.
Web Title: Sunrisers Hyderabad; IPL 05 days left
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.