Abhishek Sharma Century : आयपीएल २०२४ चा हंगाम गाजवणाऱ्या अभिषेक शर्माचा फॉर्म कायम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकीट मिळवणाऱ्यांच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने विक्रमी कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक ही सलामी जोडी प्रत्येक संघांची डोकेदुखी वाढवताना दिसली. आता पुन्हा एकदा त्याच्या स्फोटक खेळीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिषेक शर्माने अवघ्या २५ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली. त्याच्या या विक्रमी खेळीने क्रिकेट विश्वाला धक्का बसला.
अभिषेकने शेरे-पंजाब ट्वेंटी-२० सामन्यात स्फोटक खेळी केली. ४ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने त्याने शतकाला गवसणी घातली. आयपीएल २०२४ मध्ये इम्पॅक्ट पाडण्यात त्याला यश आले. 'छोटा पॅकेट बडा धमाका' म्हणून त्याने प्रसिद्धी मिळवली. डावाच्या सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी आणि षटकारांचा पाऊस पाडणारा अभिषेक चाहत्यांच्या मनात बसला. त्याने यंदाच्या आयपीएलमधील १३ सामन्यांत ३५० च्या स्ट्राईक रेटने ४६७ धावा केल्या.
अभिषेक शर्माचा सुपर शो
दरम्यान, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला भारताच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात संधी मिळाली नाही. राखीव खेळाडू म्हणून बीसीसीआय त्याला संधी देईल असे अपेक्षिते होते. मात्र, शुबमन गिल आणि रिंकू सिंग हे शिलेदार राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत विश्वचषकासाठी गेले आहेत.
अभिषेक शर्माच्या कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने ६३ आयपीएल सामने खेळले आहेत. १५५.१३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना अभिषेकने एकूण १३७६ धावा केल्या आहेत. अभिषेकच्या नावावर सात अर्धशतकांची नोंद आहे. तो सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघांचा हिस्सा राहिला आहे. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो पंजाबच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो.
Web Title: Sunrisers Hyderabad's Abhishek Sharma scored a 25-ball century in Shere-Punjab T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.