मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुरुवारी आघाडीवर असलेल्या सनरायजर्स हैदराबादची विजयी मालिका रोखण्यासाठी खेळेल. केन विल्यम्सनच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघाने आतापर्यंत तीन सामन्यात विजय मिळवला आहे आणि या दरम्यान गोलंदाजांचे प्रदर्शन शानदार राहिले.
दुसरीकडे आर. आश्विनच्या नेतृत्वात पंजाबने आक्रमक फलंदाजी करत विरोधी संघांना जेरीस आणले आहे. यजमान संघाने आतापर्यंत तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्ज विरोधात मिळवलेला विजयही आहे. भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बिली स्टेनलेक, सिद्धार्थ कौल, शाकिब अल हसन व संदीप शर्मा यांच्या उपस्थितीने हैदराबादची गोलंदाजी संतुलित आहे.
हैदराबादच्या फलंदाजीतही अनुभवाची कमी नाही. संघाकडे रिद्धीमान साहा, विल्यम्सन, शिखर धवन, मनीष पांडे यांच्यासारखे तगडे फलंदाज आहेत, तर शाकिब अल हसन, दीपक हुड्डा आणि युसुफ पठाण हे अष्टपैलू फलंदाज आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्ध १४८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला अडचणी आल्या होत्या. मात्र त्यांनी अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या सामन्यात हैदराबादने रॉयल्सला १२५ धावांवरच रोखले होते. त्यानंतर ९ गड्यांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सलादेखील १३८ धावांतच रोखले होते.
दुसरीकडे, गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला चार धावांनी पराभूत केल्यानंतर पंजाबच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.
गेलने सत्रातील पहिलाच सामना खेळताना ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. लोकेश राहुल शानदार फॉर्ममध्ये आहे. मयांक अग्रवाल, करुण नायर आणि अश्विन यांनीही छाप पाडली असून युवराज सिंगचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.
पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध सोपा विजय मिळवल्यानंतर पंजाबला दुसऱ्या सामन्यात रॉयल चँलेंजर बँगलोर संघाकडून पराभव पत्करला होता. पंजाबचा मुजीब उर रहमन याच्या फिरकीने फलंदाजांना हैराण केले होते. त्याने विराट कोहलीलादेखील बाद केले. संघाकडे अश्विन आणि मुजिबसोबतच मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि अँड्र्यू टे यासारखे गोलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)
सामन्याची वेळ :
रात्री ८ वाजता
स्थळ : आय. एस. बिंद्रा स्टेडियम, मोहाली.
Web Title: Sunrisers - Kings XI challenge to prevail in Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.