शारजाह : सलग तिसरे महिला टी-२० क्रिकेट चॅलेंज जेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेल्या सुपरनोवाज संघाला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या फायनलमध्ये ट्रेलब्लेझर्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. या लढतीत सुपरनोवाज संघाचे पारडे वरचढ मानल्या जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोवाज संघ फॉर्मात आहे. कारण शनिवारी अखेरच्या लीग सामन्यात त्यांनी स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स संघाचा पराभव केला आहे.
२०१८ व २०१९ चा चॅम्पियन सुपरनोवाजने अखेरच्या षटकात दोन धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. गत चॅम्पियन संघासाठी चामरी अटापट्टू (१११ धावा) हिने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या या अनुभवी खेळाडूने यंदाच्या मोसमात सुपरनोवाजतर्फे आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ट्रेलब्लेझर्सविरुद्ध साखळी सामन्यात तिने ४८ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी करीत स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले होते. कर्णधार हरमनप्रीतने दोन्ही सामन्यात प्रत्येकी ३१ धावांची खेळी केली. भारतीय टी-२० संघाची कर्णधार फायनलमध्ये मोठी खेळी करण्यास आतूर आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता ट्रेलब्लेझर्सने स्पर्धेत शानदार सुरुवात केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन व अनुभवी झुलन गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी वेलोसिटी संघाचा केवळ ४७ धावात खुर्दा उडवत सहज विजय नोंदवला. कर्णधार स्मृती दोन सामन्यात केवळ ३९ धावा करू शकली. फायनलमध्ये संघाला तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. सलामीवीर फलंदाज डिएंड्रा डोटिन फॉर्मात आहे, पण तिला मोठी खेळी करता आली नाही.