नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात सभा सुरु आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी काही योजनाही देशवासियांसाठी आणल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी आता भारताचा अव्वल क्रिकेटपटू पुढे आला आहे. मोदींनी आतापर्यंत चांगल्या योजना आणल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान ही त्यामधील सर्वात चांगली योजना आहे. त्यामुळे आपण साऱ्या देशवासियांनी मोदी यांनी समर्थन द्यायला हवे, अशी भावना या क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.
मोदींना साथ देण्याबाबत हा क्रिकेटपटू म्हणाला की, " पंतप्रधान मोदी यांनी भारत स्वच्छ करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या गोष्टीची सुरुवात त्यांनी प्लॅस्टिकवर बंदी आणून केली आहे. ही सर्वात चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपण देशवासियांनी पुढे येऊन मोदींचे समर्थन करायला हवे. मला स्वत:ला पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अभियानामुळे प्रेरणा मिळाली आहे. देशाला जर निरोगी बनवायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक देशवासियाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपली गल्ली, गाव आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."मोदी यांच्याबरोबर भारताच्या बऱ्याच क्रिकेटपटूंचे चांगले संबंध आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या लग्न समारंभालाही मोदी यांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर मोदी यांनीही भारतीय क्रिकेट संघाचे बऱ्याचदा कौतुक केले आहे. त्यामुळे मोदींना समर्थन द्या, असे नेमके कोणत्या क्रिकेटपटूने म्हटले असेल, याचा विचार तुम्ही करत असाल. मोदींना समर्थन देण्याचे वक्तव्य केले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने.भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरेंट 2 सप्टेंबरला काढण्यात आले होते. त्यावेळी शमीला सरेंडर होण्यासाठी पंधरा दिवासांचा अवधी देण्यात आला होता. अटक वॉरेंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. पण हा दौरा संपल्यावरही शमी भारतामध्ये परतला नव्हता. या दौऱ्यानंतर शमी हा अमेरिकेला गेला होता. आता तर शमीला अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. या गोष्टीचा आणि मोदी यांच्या समर्थनाचा काही संबंध आहे का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
शमीची पत्नी हसीन जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.