नवी दिल्ली : काही दिवसांपासून भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आणि फलंदाज मिताली राज यांच्यातील वादामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या तीनपैकी दोन सामन्यांत सामनावीराचा किताब पटकावलेल्या मितालीला उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर मिताली आणि पोवार यांनी एकमेकांवर आरोप केले. पोवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही वादावर पडदा पडलेला नाही. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी तर पोवार यांनाच पुन्हा कोच बनवा, अशी मागणी केली आहे.सीओए अध्यक्ष विनोद राय यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हरमन आणि स्मृती यांनी पोवार यांना २०२१ पर्यंत कोच बनविण्याची मागणी केली. पोवार यांचा अंतरिम कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला. बीसीसीआयने कोचपदासाठी अर्ज मागविले असून, पोवार दुसऱ्यांदा या पदासाठी अर्ज करू शकतात. या दोन्ही खेळाडूंनी सीओएला पत्र लिहिले असून, पोवार कोचपदी कायम राहावेत, अशी मागणी केली. दुसरीकडे, मानसी जोशी आणि एकता बिश्त तसेच वन डे संघाची कर्णधार मिताली या तिघी मात्र पोवार यांना पुन्हा कोच बनविण्याच्या विरोधात असल्याचे वृत्त आहे. हरमनने पोवार यांच्या समर्थनार्थ लिहिलेले पत्र वृत्तसंस्थेलादेखील पाठविले. हरमनप्रीत या पत्रात म्हणते, ‘उपांत्य सामन्यातील पराभव काळजावरील आघात होता. दुसरीकडे वादामुळे आमची प्रगती डागाळली. कोच या नात्याने पोवार सरांनी सर्व खेळाडूंमध्ये सुधारणा घडवून आणली. तांत्रिक तसेच मानसिकदृष्ट्या भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलला आहे. त्यांनी आमच्यात विजिगीषू वृत्तीचा संचार केला. मितालीला बाहेर करणे, हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता. पोवार एकटे जबाबदार नाहीत.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हरमनप्रीत, स्मृतीकडून रमेश पोवार यांचे समर्थन
हरमनप्रीत, स्मृतीकडून रमेश पोवार यांचे समर्थन
काही दिवसांपासून भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आणि फलंदाज मिताली राज यांच्यातील वादामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:37 AM