नवी दिल्ली - श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविण्यात यावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोउच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं बीसीसीआयला याचा जबाव मागितला आहे. यासाठी चार आठवड्याची मुदत दिली आहे. बीसीसीआयने 2013 च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये कथित सहभागाबद्दल श्रीशांतवर बंदी घातली होती. श्रीशांतचे पुनरागमन होऊ नये यावर बीसीसीआय ठाम आहे.
34 वर्षांचा वेगवान गोलंदाज श्रीसंत याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवून बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्याच्यावरील बंदी उठविली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीशांतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. बीसीसीआयच्या आव्हानानंतर केरळ उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली होती.
श्रीशांतनं केरळच्या उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बीसीसीआयला श्रीशांतच्या या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी कोर्टानं चार आठवड्याचा वेळ दिला आहे.
2013 सालच्या आयपीएलमध्ये श्रीशांतसह अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे तीन शिलेदार स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 2015 साली तिघांसह 36 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मात्र, न्यायालयाने निर्दोश मुक्तता केली असली तरी बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी कायम ठेवली होती. याविरोधात श्रीशांतने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
श्रीशांतने भारताकडून 27 कसोटी, 53वन डे आणि 10 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑगस्ट 2011 मध्ये त्याने देशाकडून अखेरचा सामना खेळला होता.