कोलकाता - अखेरच्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहोचलेला भारत-श्रीलंका कसोटी सामना अखेर अनिर्णीत राहिला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन भारताचा विजय दृष्टीपथात आणला होता. पण ऐनवेळी अपु-या प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या विजयाची संधी हुकली. त्यावेळी श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा झाल्या होत्या.
भारताने श्रीलंकेला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य दिले होते. अखेरच्या काही षटकांमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंगरुममध्ये तणाव स्पष्टपणे दिसत होता. कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांचा प्रभावी मारा हे अखेरच्या दिवसाचे वैशिष्टय ठरले. श्रीलंकेची अक्षरक्ष: सामना वाचवण्यासाठी धडपड सुरु होती.
भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी एकाटोकाकडून भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वरने 10 षटकात आठ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीने दोन आणि उमेश यादवने एक गडी बाद केला. दुस-या डावातील कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले. विराटने नाबाद (104) धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील विराटचे हे 18 वे तर, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून विराटचे हे 50 वे शतक आहे.
भारताने आपला दुसरा डाव 8 बाद 352 धावांवर घोषित केला. श्रीलंकेकडे पहिल्या डावातील 122 धावांची आघाडी होती. भारताचा पहिला डाव 172 तर श्रीलंकेचा पहिला डाव 294 धावांवर संपुष्टात आला होता. श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली असून त्यांना पहिला झटका बसला आहे. सलामीवीर समाराविक्रमाला भुवनेश्वर कुमारने भोपळलाही फोडू न देता क्लीनबोल्ड केले.
पाचव्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. विराटने 119 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी करताना 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुस-या डावात लंकेकडून लकमल आणि शानाकाने प्रत्येकी तीन तर गामाजे आणि परेराने प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारत आणि श्रीलंकेमध्ये पाचव्या दिवसाच्या खेळ सुरु झाल्यानंतर भारताला सकाळच्या सत्रात तीन धक्के बसले. कालच्या 1 बाद 171 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर लोकेश राहुलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. कालच्या धावसंख्येत आणखी सहा धावांची भर घातल्यानंतर लकमलने राहुलला (79) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे पाठोपाठ बाद झाले. पूजाराला (22) धावांवर लकमलने परेराकरवी झेलबाद केले. त्यानंतर रहाणेला (0) लकमलने पायचीत पकडले. काल सकाळच्या सत्रात भारताने श्रीलंकेला धक्के दिले होते. या कसोटीचे पहिले दोन दिवस पावसामुळे वाया गेले.
ईडन गार्डन्सवरील अनुकूल स्थितीचा लाभ घेताना धवन व राहुल यांनी १६६ धावांची भागीदारी केली. या दोघांनी श्रीलंकेची पहिल्या डावातील १२२ धावांची आघाडी भरून काढताना भारताला चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत आघाडी मिळवून दिली. सलामीवीर शिखर धवन (94) धावांवर बाद झाला.
परेराने ड्रेसिंग रूमकडे बघून घेतला रिव्ह्यूश्रीलंकेचा फलंदाज दिलरुवान परेराने मैदानी पंच नायजेल लाँग यांनी पायचित दिल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे बघून रिव्ह्यू घेतला. त्याचा रिव्ह्यू यशस्वी ठरला असला तरी त्याची ही कृती मात्र कॅमे-यामध्ये टिपली गेली.
डावाच्या ५७ व्या षटकात खाते उघडण्यापूर्वीच परेराला पंच लाँग यांनी पायचित बाद दिले होते. त्यानंतर परेराने दुसºया टोकावर उभ्या असलेल्या रंगाना हेराथकडे बघितले आणि त्यानंतर तंबूकडे परतायला लागला. पण, ड्रेसिंग रूममध्ये वळल्यानंतर त्याने अचानक रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. रिव्ह्यूमध्ये तिस-या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला.
परेरापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही भारताविरुद्ध मार्चमध्ये बंगळुरू कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूमकडे बघून रिव्ह्यूसाठी इशारा केला होता. परेराला मात्र ड्रेसिंग रूममधून कुठली मदत मिळाली किंवा नाही, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
नियमानुसार रिव्ह्यूसाठी क्षेत्ररक्षण करणा-या संघाच्या कर्णधाराला मैदानावरील सहकारी खेळाडूंकडून तर फलंदाजाला दुस-या टोकावर उभ्या असलेल्या फलंदाजाकडून सल्ला घेण्याचा अधिकार आहे. आयसीसीच्या नियमानुसार जर पंचाला रिव्ह्यूसाठी मैदानाबाहेरून मदत मिळाली असे वाटले तर तो रिव्ह्यू रद्द करण्याचा अधिकार आहे.