Rinku Singh, Team India : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सध्या मॅच फिनिशिर म्हणून प्रसिद्ध आहे. IPL मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सलग ५ षटकार मारल्यानंतर, त्याला मॅच फिनिशर स्पेशालिस्ट म्हणण्यास सुरूवात केली गेली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत पहिल्या सामन्यातही असेच घडले. रिंकूने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला आणि तो मॅच फिनिशर असल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या दमदार खेळानंतर रिंकू सिंगनेसुरेश रैनाबद्दल एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली.
रिंकू सिंग म्हणाला की, सुरेश रैना त्याचा आदर्श आहे आणि सांगितले की तो त्याच्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहे. रिंकू सिंग म्हणाला, "आज मी जो काही आहे त्यात सुरेश रैनाचे खूप मोठे योगदान आहे. तो माझा आदर्श आहे आणि मला त्याच्याकडून प्रेरणा मिळते. मी खेळताना त्याचे अनुकरण करतो आणि मला त्याच्यासारखे व्हायचे आहे. त्याने माझे आयुष्य बदलले. त्याने न मागता सर्व काही दिले. रैनाने मला क्रिकेटमध्ये आवश्यक ते सर्व दिले. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही प्रकारचा गोंधळ होतो, तेव्हा मी रैनाने सांगितलेल्या गोष्टी ऐकतो."
"मैदानावरील दडपण कसे हाताळायचे हे त्याने मला शिकवले. रैनाने मला सांगितले की मी आधी ४-५ चेंडू खेळावे, खेळपट्टी समजून घ्यावी आणि सेटल झाल्यावर फटकेबाजी सुरू करावी. त्याचा हा सल्ला मला खूपच कामी आला. आयपीएल आणि टीम इंडियामध्ये मला याचाच फायदा झाला. मी या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. मी सध्या याचा जास्त विचार करत नाही पण संधी मिळाली तर नक्कीच फायदा घेईन. ते कोणतेही फॉरमॅट असो आणि जगातील कोणतेही मैदान असो, मी माझे शंभर टक्के देईन," असेही रिंकू म्हणाला.