नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरैश रैनाने (Suresh Raina) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो आयपीएल आणि कॉमेंट्रीच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडला होता. मात्र आता आशिया चषकाचा थरार रंगला असतानाच त्याने मोठा निर्णय घेऊन क्रिकेटला रामराम केले आहे. अर्थातच सुरैश रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून देखील संन्यास घेतला असून तो आता आयपीएलमध्येही खेळणार नाही.
2022 च्या IPL पासून राहिला होता वंचितआयपीएल 2021 चा हंगाम सुरैश रैनासाठी अत्यंत निराशाजनक राहिला, ज्यामध्ये त्याला 12 सामन्यांमध्ये फक्त 160 धावा करता आल्या होत्या. त्याच्या या खराब प्रदर्शनाचा फटका त्याला 2022 च्या आयपीएल हंगामात बसला. लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने रिलीज केल्यानंतर त्याला लिलावात देखील कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नाही. लक्षणीय बाब म्हणजे सुरेश रैना एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये पाच हजारहून अधिक धावा केल्या आहेत. रैनाने 2008 ते 2021 या कालावधीत आयपीएलच्या 205 सामन्यांमध्ये 32.51 च्या सरासरीने 5,528 धावा केल्या ज्यात 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
क्रिकेटला दिला पूर्णविराम सुरेश रैनाने मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून क्रिकेटच्या सर्व सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. "माझ्या देशाचे आणि राज्याचे उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करू इच्छितो. तसेच मला पाठिंबा देणारे सर्व @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL @ShuklaRajiv सर आणि सर्व चाहत्यांचे आभार", अशा शब्दांत रैनाने निवृत्तीची घोषणा केली.