नवी दिल्ली : भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना याचे वर्ल्ड कप संघातील पुनरागमनाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मात्र, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धुमाकूळ घालण्यासाठी रैना सज्ज आहे आणि त्याने त्याची झलक सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात दाखवून दिली. त्याने 35 चेंडूंत नाबाद 54 धावा करताना उत्तर प्रदेश संघाला सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 मालिकेत इ गटात हैदराबादविरुद्ध सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. रैनाने या सामन्यात एक भीमकाय पराक्रम केला. त्याने ट्वेंटी-20 क्रिकेट कारकिर्दीत 300 षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. सिक्सर किंग रोहित शर्मा याच्यानंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 300 षटकार खेचणारा रैना दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
रैनाचे भारतीय संघातील पुनरागमनाच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. त्यात युवा खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना संघातील स्थानासाठी कडवी चुरस निर्माण केली आहे. रैनाला मात्र आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत रैनाला सूर गवसला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 139 धावा केल्या. बीपी संदीपने सर्वाधिक 33 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रैनाच्या फटकेबाजीच्या जोरावर उत्तर प्रदेशने 18.3 षटकांत हा पल्ला पार केला. त्याला उपेंद्र यादव ( 25) आणि समर्थ सिंह ( 36 ) यांनी उत्तम साथ दिली.