मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार अन् संपूर्ण देशात झालेला जल्लोष, आजही तसाच डोळ्यासमोर उभा आहे. 28 वर्षांनंतर भारतीय संघानं वन डे वर्ल्ड कप जिंकला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि टीमच्या खेळाडूंनी त्याला खांद्यावर बसवून स्टेडियमवर प्रदक्षिणा घातली. श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेकरा याच्या गोलंदाजीवर धोनीनं विजयी षटकार खेचला. अंतिम सामन्यात गौतम गंभीर आणि धोनी हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. पण, या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू सुरेश रैनानं टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचं श्रेय वेगळ्याच खेळाडूला दिलं आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद 103 धावांच्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी 6 बाद 274 धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर सचिन तेंडुलकर केवळ 18 धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (35) आणि गौतम गंभीर (97) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला.
खलीज टाईम्सशी बोलताना रैनानं वर्ल्ड कप विजयाचं श्रेय तेंडुलकरला दिलं. तो म्हणाला,''तेंडुलकरचा संयमी स्वभाव आमच्यासाठी महत्त्वाचा होता. सचिनमुळेच हा वर्ल्ड कप जिंकलो.संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये त्यानं आपण जिंकू शकतो हा विश्वास निर्माण केला. तो संघातील दुसरा प्रशिक्षकच होता.''
2011च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 9 सामन्यांत 53.55च्या सरासरीनं 482 धावा केल्या होत्या. युवराज सिंगन या स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले होते.